Gadchiroli : महाराष्ट्रातील राजकारणात योगदान दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते तथा राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मराव बाबा आत्राम लवकरच गडचिरोलीतून दिल्लीकडे झेप घेण्याच्या तयारीत आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीत ते आपले भाग्य आजमावणार आहेत. महाराष्ट्राच्या शेवटच्या कोपऱ्यात असलेल्या या लोकसभा मतदार संघातून त्यामुळे आत्रामांचे नाव निश्चित मानले जात आहे.
नागपूर येथे शनिवारी (ता. 6) प्रसार माध्यमांशी बोलताना आत्राम यांनी ही माहिती दिली. महायुतीच्या माध्यमातून आपल्या गडचिरोली लोकसभा मतदार संघाची निवडणूक लढविण्याची इच्छा आहे. आपण त्याची पूर्ण तयारी केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात आपली राजकीय पकड मजबूत आहे. त्यामुळे महायुती आपल्याला संधी देईल असा विश्वास आत्राम यांनी व्यक्त केला.
गुरुवारी (ता. 9) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गडचिरोलीत येत आहेत. शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत महिला मेळावा होणार आहे. या मेळाव्याचा आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीला नक्कीच फायदा होईल, असे ते म्हणाले. गडचिरोली जिल्ह्यातून भाजपचे खासदार प्रतिनिधीत्व करतात. परंतु यंदा लोकांना नवा चेहरा हवा आहे. त्यामुळे आपण या मतदार संघातून संधी मिळाल्यास निवडणूक लढविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
महायुतीचे ‘मिशन 45’ ठरले आहे. राज्यातील 45 जागांवर विजय मिळविण्याचे हे मिशन आहे. या जागांवर विजय मिळविण्यासाठी बैठक घेण्यात येत आहेत. आता विभागवार बैठकसत्र सुरू होणार आहे. विदर्भात किती जागा लढायच्या यावरही या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे, असे आत्राम यांनी सांगितले. महायुतीत अद्याप जागा वाटपाचे सूत्र ‘फायनल’ झालेले नाही. त्यामुळे कुणीही नाराज असण्याचे काहीच कारण नाही, असेही त्यांनी नमूद केले. ग्रेसपासून महायुतीला कोणताही धोका नाही. महाराष्ट्रात महायुतीने आणि देशात नरेंद्र मोदी सरकारने अनेक योजना राबविल्या आहेत. विकासाच्या या सगळ्या योजना आहेत. महिलांसाठीही भरीव काम केले आहे. महिलांचे सक्षमीकरण करण्यात आले आहे, असे आत्राम यांनी स्पष्ट केले.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
आमदार रोहीत पवार यांच्या बारामती ॲग्रोवर ईडीने छापा घातला. याबाबत बोलताना आत्राम म्हणाले की, ईडी कुणाच्या दबावात काम करत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांनाच मिळणार आहे. त्यामुळे शरद पवार व उद्धव ठाकरे गटातील नेत्यांना काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याची वेळ येणार असल्याचा दावाही त्यांनी केला.
Edited by : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.