

Dilipkumar Sananda News : काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा जोरात रंगली आहे. याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लावण्यात येत आहेत. दिलीपकुमार सानंदा जर भाजपमध्ये गेले तर पश्चिम विदर्भात एक मोठा धक्का काँग्रेसला (Congress) मानला जाणार आहे.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजपमध्ये (BJP) प्रवेश केल्यानंतर त्यांचे समर्थक दिलीप सानंदा हेसुद्धा लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे.
दिलीप सानंदा हे गेल्या अनेक दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या सुरू होत्या. आता गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) मुंबईत असल्याने त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
सानंदा हे दिवंगत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख (Vilasrao Deshmukh) यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जात होते. मात्र, विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यानंतर काँग्रेसच्या राजकारणात सानंदा यांचे वर्चस्व कमी झाल्याचे बघायला मिळाले.
सलग तीन वेळा आमदार राहिलेल्या सानंदा यांना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन झाल्यानंतर पक्षात दुय्यम वागणूक मिळत आली आहे. त्यानंतर दिलीप सानंदा यांनी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना जवळ केले होते.
त्यांचे समर्थक म्हणून सानंदा यांची ओळख झाली होती. मात्र, नुकताच माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर चव्हाण यांचे समर्थक माजी आमदार सानंदा हे काँग्रेसमध्ये सक्रिय नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. अखेर सानंदा भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याच्या चर्चा आता रंगल्या आहेत.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दिलीप सानंदा यांनी 1999 मध्ये खामगाव (Khamgaon) विधानसभेची निवडणूक लढवली. तेव्हापासून ते सलग तीन वेळा 2009 पर्यंत काँग्रेसचे आमदार राहिले. मात्र, 2014 साली भाजपचे आकाश फुंडकर यांनी त्यांचा पराभव केला आणि 2019 मध्ये त्यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता.
राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यातील भारत जोडो यात्रा ही बुलढाणा (Buldana) जिल्ह्यातून गेली. त्यावेळेला दिलीप सानंदा यांनी सक्रिय सहभाग नोंदवला नसल्याचा ठपकाही काँग्रेस नेत्यांनी त्यांच्यावर ठेवला होता. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पक्षात निष्क्रीय झालेले दिलीप सानंदा हे आता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे.
कोण आहेत दिलीपकुमार सानंदा?
राज्याच्या राजकारणात दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे कट्टर समर्थक म्हणून सानंदा यांची ओळख आहे. सावकारीच्या प्रकरणामुळे दिलीप सानंदा हे देशभरात वादग्रस्त ठरले होते. याच प्रकरणात कारवाई शिथिल करण्यासाठी पोलिसांवर दबाव टाकल्याच्या आरोपांमुळे विलासराव देशमुखांचं मुख्यमंत्रिपददेखील पणाला लागलं होत. 2014च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे दिवंगत मंत्री पांडुरंग फुंडकरांचा (Pandurang Fundkar) मुलगा आकाश फुंडकर यांच्याकडून सानंदा पराभूत झाले होते.
...तर भाजपकडून विधानसभेची उमेदवारी !
दिलीप सानंदा यांचं काँग्रेसमध्ये मोठं प्रस्थ आहे. खामगाव मतदारसंघ हा काँग्रेसचा गड मानला. ज्याचे सलग तीन वेळा त्यांनी या मतदारसंघाचे नेतृत्व केलं. काँग्रेस वाढविण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. मात्र, विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे त्यांची मोठी हानी झाली.
त्यानंतर अशोक चव्हाण हेसुद्धा भाजपवासी झाले. सानंदा यांना खामगाव विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, तर दुसरीकडे विद्यमान आमदार आकाश फुंडकर (Akash Fundkar) यांच्या नावाची चर्चा अकोला लोकसभा मतदारसंघासाठी सुरू आहे. असे झाल्यास सानंदा यांना भाजपमध्ये रिक्त झालेला खामगाव मतदारसंघात उमेदवारी मिळू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
Edited By : Atul Mehere
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.