राज्य सरकारने ७५ हजार पद भरतीची घोषणा केली. त्याकरता रिक्त पदांची माहितीही मागविण्यात आली. परंतु आता नव्याने आकृतिबंध तयार करण्याचे निर्देश शासनाने दिले. याचा परिणाम पद भरतीवर होणार असून भरती प्रक्रिया रखडणार आहे. देशासह राज्यात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात असल्याचा आरोप होत आहे.
राज्यात सर्वच विभागात मोठ्या प्रमाणात पदे रिक्त आहे. रिक्त पदांचा आकडा लाखांच्या घरात असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ७५ हजार पदे भरण्याचे जाहीर केले. परंतु ही पदे किती वर्षात भरण्यात येतील, हे स्पष्ट केलेले नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांनाही पद भरतीचे अधिकारी दिले.
पद भरतीसाठी रिक्त पदांची माहितीही शासनाने (State Government) मागविली. सर्व विभागांनी संबंधित माहिती शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविली. आता शासनाने नव्याने आकृतिबंध तयार करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्या. त्यानुसार सुधारित आकृतिबंध तयार करण्यात येत आहे. काही विभागाचे काम पूर्ण झाले असून काहींचे काम अपूर्ण आहे.
बिंदूनामावली बदलणार..
नव्या आकृतिबंधाचा बिंदूनामावलीवरही परिणाम होणार असून तीही नव्याने तयार करावी लागेल. त्याआधारे आरक्षण निहाय रिक्त पदांची माहिती शासनाला सादर करावी लागेल. यात बराच वेळ जाणार आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेला विलंब होणार असल्याचे सांगण्यात येते.
अनेक पदे रद्द..
जिल्हा परिषदेकरिता (ZP) मंजूर असलेल्या पदांचा सुधारित आकृतिबंध अंतिम करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात होती. त्यांनी आपला अहवाल दिला. त्यांच्या शिफारशीनुसार जिल्हा परिषदेकडील अनेक पदे रद्द होऊन अनेक कर्मचारी अतिरिक्त ठरणार आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने नवीन आकृतिबंध तयार केला. यानुसार काही पदे रद्द झाली. तर नवीन पदेही निर्माण करण्यात आली. जुन्यानुसार ४४ पदे होती. ती आता ८८ होणार आहे. इतरही विभागांना नव्याने आकृतिबंध तयार करायचा आहे.
मेगा भरती हवेतच..
तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या काळात ७२ हजार पदांची मेगा भरती करण्याचे जाहीर केले होते. त्यावेळी अर्जही मागविण्यात आले होते. परंतु ती घोषणाही हवेतच विरली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.