Yavatmal and Washim District Political News : पंडित नेहरूंनी सर्वप्रथम जातीनिहाय जनगणनेला विरोध केला होता. तसेच यापुढे कधीही जनगणना करू नका, असे सांगितल्याची कबुली काँग्रेसच्या एका तत्कालीन मंत्र्याने लोकसभेत दिली होती. एवढेच नव्हेतर कॉंग्रेससह तत्कालीन शिवसेनेने त्यावेळी ओबीसी आरक्षणाला विरोध केला होता, असा घणाघाती आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. (The then Shiv Sena along with the Congress had opposed the OBC reservation at that time)
मंडल आयोगाच्या शिफारशींचा अहवाल त्यांनीच अनेक वर्षे दडवून ठेवत स्वीकारला नव्हता, असा गौप्यस्फोटही फडणवीसांनी केला. फडणवीस म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या वतीने ओबीसी जागर यात्रा काढण्यात आली होती. या यात्रेचा समारोप आज (ता. १३) बंजारा समाजाची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाशीम जिल्ह्यातील पोहरादेवी येथे झाला. या समारोपीय कार्यक्रमाला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते.
काँग्रेस आणि तत्कालीन शिवसेनेवर फडणवीसांनी अनेक आरोप केले. त्यामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशी न स्वीकारता ओबीसींना त्यांच्या हक्काच्या आरक्षणापासून वंचित ठेवण्याचे पाप काँग्रेस आणि तत्कालीन शिवसेनेने केले. याउलट देशात व्ही. पी. सिंग आणि भाजपचे सरकार असताना ओबीसींना आरक्षण दिल्या गेल्याचे ते म्हणाले. त्यांनी देशात आजवर काँग्रेसचे २५० मुख्यमंत्री झाले, असे सांगितले.
२५० पैकी १७ टक्के मुख्यमंत्री ओबीसी होते. याउलट भाजपचे केवळ ६८ मुख्यमंत्री झाले. त्यातील १७ टक्के मुख्यमंत्री ओबीसी आहेत. एवढेच नव्हेतर देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी आहेत. काँग्रेस पक्ष नेहमीच ओबीसींच्या विरोधात राहिला आहे. त्यातूनच त्या विकास पुरुषाला कधी ‘चायवाला’ तर कधी ‘मौत का सौदागर’, अशी बिरुद लावून त्या व्यक्तीलाच नव्हे, तर संपूर्ण ओबीसी समाजाला कमी लेखण्याचं कामही काँग्रेस सातत्याने करीत आल्याचेही या वेळी फडणवीस म्हणाले.
नागपुरात बंद पडलं दुकान..
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'मोहब्बत की दुकान' या विषयावरून कॉंग्रेस नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. मोहब्बत म्हणजे प्रेम, प्रेम ही वस्तू जगातल्या कुठल्याच दुकानात मिळत नाही. ते मनात असावे लागते. हेच समजत नसेल तर मोहब्बत की दुकान चालणार कशी, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. एवढेच नव्हेतर काल नागपुरातील काँग्रेसच्या बैठकीत दोन पदाधिकाऱ्यांत वाद झाला. त्या दोघांनी एकमेकांच्या गचांड्या पकडल्या. ही राहुल गांधींची ‘मोहब्बत की दुकान’ नागपुरात बंद पडल्याचेही ते त्या घटनेवरून म्हणाले.
पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमने...
विकासपुरुष पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश बळकट केला. त्यातून आता देशाची महासत्तेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. भारत देश हा लवकरच मोदींच्या नेतृत्वात तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले. एवढेच नव्हेतर ओबीसी, भटके-विमुक्त, अनुसूचित जाती-जमाती अशा विविध घटकांसाठी विविध योजना आणल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
Edited By : Atul Mehere
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.