Eknath Shinde : मी अडीच वर्षांपूर्वीच जोरदार धक्का देऊन ‘त्यांचा’ टांगा पलटी केलाय; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना जोरदार टोला!
Nagpur, 21 February : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आगमनाप्रीत्यर्थ नागपूर शहर आणि विदर्भात सर्वत्र त्यांच्या स्वागताचे पोस्टर लागले होते. त्यावर ठळकपणे ‘दे धक्का’ असे लिहिण्यात आले होते. त्यामुळे विदर्भात शिंदे कोणाला धक्का देणार याचीच सर्वत्र चर्चा सुरू होती. त्यावर शिंदे म्हणाले, मला ज्यांना धक्का द्यायचा होता, तो आधीच दिला आहे. आता त्यांची क्रेडिबिलिटी संपली आहे. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या कंपनीचा शेअर बाजारात भाव पडला आहे. त्यांचे शेअर कोणी घ्यायला तयार नाहीत. आमची कंपनी जोरदार सुरू आहे. विश्वासपात्र आहे. त्यामुळे शेकडो शिवसैनिक आमच्याकडे येत असल्याचे सांगून त्यांनी संजय राऊतांना टोला लगावला.
खासदार संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना रोज धक्के बसत आहे, ते धक्का पुरुष झाले आहेत, महायुतीत गेले, तेव्हापासून त्यांना जपानप्रमाणे रोज भूकंपाचे धक्के बसत असल्याचा तोफ डागली होती. शिंदे यांनी त्यास नागपूरमधून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांना धक्का दिला, चांगले काम करणाऱ्या नेत्यांना धक्का मारून बाहेर काढले, त्यांना मी अडीच वर्षांपूर्वीच जोरदार धक्का दिला होता. त्यांचा टांगा पलटवून टाकला आणि महायुतीची (Mahayuti) सत्ता आणली. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीतही महायुतीने बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांना धक्का देणाऱ्यांना महाराष्ट्रातील जनतेनी धक्का देऊन पाच वर्षांसाठी घरी बसवले आहे.
सध्या मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यात पटत नसल्याची चर्चा जोरात सुरू आहे. शिंदे नाराज आहेत, असेही बोलले जाते. या दरम्यान त्यांनी ‘मला हलक्यात घेऊ नका,’ असे वक्तव्य केले होते. त्यामुळे त्यांचा इशारा कोणाला आहे, अशी चर्चा सुरू होती. आज त्याचा खुलासा शिंदे यांनी केला.
ते म्हणाले, विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच मी महायुतीचे २०० पेक्षा जास्त आमदार निवडून येतील, असे सांगितले होते. आमच्या २३२ जागा निवडून आल्या आहेत. त्याचवेळी मला हलक्यात घेऊ नका, असे मी म्हटले होते. मात्र त्यांनी ते ऐकले नाही. माझा इशारा ज्यांना द्यायचा होता, तो दिला आहे, असे सांगून शिंदे कोणाला इशारा दिले, हे सांगण्यास नकार दिला.
संजय राऊत यांना प्रत्येकच गोष्ट खटकते. ते माझ्यावर रोज आरोप करतात. पराक्रमी महादजी शिंदे यांच्या नावाने एका मराठी माणसाने दिलेल्या पुरस्कारावरही त्यांचा आक्षेप आहे. ज्यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवला, सरकार स्थापन केले, त्या शरद पवार यांनाही त्यांनी सोडले नाही. एवढेच नव्हे महादजी शिंदे, साहित्यिकांचाही त्यांनी अपमान केला. कारण नसताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनाही या वादात खेचले.
अहो किती जळाल, एक दिवस जळून खाक व्हाल, असे सांगून शिंदे यांनी कधीतरी सुधारणार की नाही, अशी संजय राऊत यांना विचारणा करून चांगलेच डिवचले. माझ्यावर कितीही आरोप लावा की शिव्या द्या काही फरक पडत नाही. जो पर्यंत जनता माझ्यासोबत आहे, तोपर्यंत मला कुणाची चिंता करण्याची गरज नसल्याचेही शिंदे म्हणाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.