
हेमलता वाडकर
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद ही ठाणे, रायगड, पालघरपुरती मर्यादित आहे. मुंबईत सध्या तरी उद्धव ठाकरेंचाच प्रभाव दिसतो. तो कमी करण्यासाठी भाजप राज ठाकरेंना टाळी देण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिका भाजप स्वतंत्र लढण्याचे संकेत देत आहे. अशा वेळी शिंदेंना ताकद दाखवावी लागेल. हा त्यांच्यासाठी सर्वात कठीण ‘पेपर’ असेल. दुसरीकडे ठाणेसह जिल्ह्यातील अन्य महापालिकांवर कमळ फुलवण्याची तयारी झाली आहे. त्यासाठी ‘रसद’ पुरवल्याची चर्चा आहे.
पद बदला है, कद वही है...’ एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे पुन्हा मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न भंगल्यानंतर व उपमुख्यमंत्री पद स्वीकारल्यानंतर त्यांच्या समर्थकांनी अशी पोस्ट टाकली होती. खुद्द शिंदे यांनाही आपले किमान दोन क्रमांकावर स्थान राहील व तितकेच महत्त्वाचे पद मिळेल अशी अपेक्षा होती. पण सरकार स्थापनेपासून ते आतापर्यंतच्या नाराजीनाट्यामुळे शिंदे व त्यांची शिवसेना सतत बॅकफूटवर जाताना दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून तुटलेला सुसंवाद आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ही पोकळी भरल्यामुळे शिंदे तिसऱ्या क्रमांकावर आले आहेत अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. दुसरीकडे सत्तेसाठी सोबत असलेले आपलेच मंत्री कधी दगा देतील याची शाश्वती नसल्यामुळेही पक्षासाठी हा कसोटीचा काळ असल्याचे मानले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत शिंदे यांनी जीव ओतून काम केले. विविध कल्याणकारी योजना आणून सरकारी अनुदानाचे मतांमध्ये परिवर्तन घडवून आणले. ही किमया साधताना पुढील मुख्यमंत्रीही आपणच राहू अशा विश्वास त्यांनी उराशी बाळगला होता. हा भ्रमाचा भोपळा भाजपश्रेष्ठींनी फोडला. त्यानंतर विविध मुद्द्यावरून या पक्षाला डावलले जात असल्याने नाराजीनाट्याच्या घडामोडी पाहायला मिळत आहे.
मुख्यमंत्रीपद, कधी पालकमंत्रीपद तर कधी खातेवाटपातून ही नाराजी पुढे येत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिंदे यांनी शिवसेनेत (Shivsena) बंड करून एक हिंमत दाखवली. त्यांच्या या ‘कौशल्यामुळेच’ शिवसेना फुटली आणि 40 आमदारांची मोट बांधून दिल्लीतल्या महाशक्तीच्या बळावर ते मुख्यमंत्री झाले होते. शिंदे मुख्यमंत्री झाले तरी ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या छत्रछायेखाली असतील असा कयास राजकीय विश्लेषकांनी बांधला होता. पण शिंदे यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात स्वतःचे वलय निर्माण केले. फडणवीस आणि भाजप काहीसी लपली गेली होती. मात्र फडणवीस संधीची वाट बघत होते. मुख्यमंत्री बनताच त्यांना ही संधी मिळाल्याने त्यांनी आता त्यांनीच ‘घडवलेल्या’ शिवसेनेचे पंख छाटण्यास सुरुवात केली आहे.
बलस्थानांवर घाला
एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे सध्या 57 आमदार आहेत. निवडणुकीत राज्यभरात या पक्षाचा 'स्ट्राईक रेट' चांगला असला तरी खरा प्रभाव हा ठाणे, पालघर, रायगड आणि काही अंशी कोकणात आहे. त्यामुळे सर्वप्रथम त्यांची ही बलस्थाने भाजपकडून कमकुवत करण्यात येत असल्याची चर्चा आहे. त्यासाठी आधी गणेश नाईक यांना महत्व देण्यात आले. पालघर जिल्ह्याचे पालकमंत्रिपद नाईक यांना दिले असले तरी ठाण्यात त्यांना ‘जनता दरबार’ घेण्याची मोकळीक दिली आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदाचा तिढा कायम असताना उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतून शिवसेना शिंदे गटाला वगळले. दुसरीकडे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व मंत्र्यांच्या खासगी सचिव नियुक्तीचा अधिकार स्वतःकडे घेतला. त्यामुळे शिंदे गटाचे मंत्री अस्वस्थ झाले आहेत.
मंत्र्यांची नाराजी
निर्णय घेताना निदान आपणाला कळवत जा, असे पत्र उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या खात्यातील सचिवांना लिहिले आहे. या पत्रामुळे एकच गदारोळ झाला. त्यावर सारवासारव करण्याचा प्रयत्न सामंत यांनी केला असला तरी आपण बिनअधिकाराचे मंत्री असल्याचा संदेश देण्याचा हेतू त्यांनी साध्य केला आहे. अशीच एक घटना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याबाबतीत घडली. परिवहन खात्याच्या अध्यक्षपदी निवड परस्पर झाली. ही माहिती आपणाला वर्तमानपत्रातून कळाल्याचे ते म्हणाले. मंत्री शंभूराज देसाई असो वा गुलाबराव पाटील त्यांनीही आपली नाराजी वारंवार बोलून दाखवली आहे. मुख्यमंत्री फडणवीस दिल्लीच्या शिस्तीप्रमाणे आपला कारभार चालवत आहेत. त्यामुळे पूर्वी शिंदे सरकारमध्ये असलेली मोकळीक मिळत नसल्याचा या गटाच्या मंत्र्यांचा सूर आहे.
दिल्लीत सलोखा
मोदी सरकारमध्ये शिवसेना शिंदे गट हा एक महत्त्वाचा घटक आहे. सात खासदारांचा पाठिंबा मोदी सरकारला आहे. पंतप्रधान मोदी आणि भाजपचे राजकीय चाणक्य गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत शिंदे यांचे चांगले सूर जुळले आहेत. ‘धरले तर चावते अन् सोडले तर धावते’ अशी गत भाजपची झाली असल्याने सध्या तरी दिल्लीश्र्वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फारसे दुखवत नसल्याचे दिसते. 9 फेब्रुवारीला शिंदे यांच्या वाढदिवसाला मोदी यांनी स्वतः फोन करून शुभेच्छा देणे हे सर्वकाही अलबेल असल्याचे दाखवण्याचा प्रयत्न होता. पण राजकारणाच्या पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे ही जोडी क्वचित पहायला मिळत आहे. त्याऐवजी मुख्यमंत्र्यांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार जास्त दिसतात. हे चित्र बोलके आहे.
पक्ष टिकवण्याचे आव्हान
शिंदेंसोबत गेलेले 40 आमदार अन् आता निवडून आलेले 57 आमदार हे सत्तेसाठीच सोबत आहेत. शिवसेना पक्ष आणि चिन्ह मिळाले असले तरी ठाकरेंची शिवसेना फुटली तशी शिंदे सेना फुटण्यासही वेळ लागणार नाही, हे शिंदे जाणून आहेत. त्यासाठीच सध्या मिळालेल्या वेळेचा वापर ते पक्षवाढीसाठी करत आहेत. किंबहुना पक्षफुटीची वेळ आलीच तर 'प्लॅन बी' तयार असावा अशी त्यांची रणनीती असू शकते. म्हणूनच ते सध्या ठाकरे यांच्या शिवसेनेचे शिलेदार फोडून आपल्याच ‘विश्वासूं’समोर पर्याय उभा करण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.