
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये जोरदार इनकमिंग सुरु आहे. अशात अमरावती जिल्ह्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे. जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि भाजपचे दबंग नेते जगदीश गुप्ता लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. समर्थकांच्या बैठकीत नुकताच हा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र प्रवेशाचा मुहूर्त अद्याप निघालेला नाही.
गुप्ता यांच्या रुपाने शिवसेनेला जिल्ह्याच्या राजकारणाची नस न् नस माहिती असलेला नेता मिळाल्याची चर्चा आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना अमरावती महापालिका निवडणुकीत आणि जिल्हा परिषद निवडणुकीत गुप्ता यांचा मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. शिंदे यांनी यापूर्वीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या निष्कासीत नेत्या प्रिती बंड यांचाही शिवसेनेत प्रवेश झाला आहे.
जगदीश गुप्ता हे भाजपच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक मानले जातात. 1990 मध्ये अमरावतीत काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरूंग लावत ते निवडून आले होते. 1995 मध्येही त्यांनी दुसऱ्यांदा विजय मिळवला. युती सरकारमध्ये ते राज्यमंत्री आणि अमरावतीचे पालकमंत्रीही झाले. पण 1999 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या डॉ. सुनील देशमुख यांनी गुप्ता यांचा पराभव केला.
पण लगेचच म्हणजे 2000 मध्ये गुप्ता यांनी विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून दणदणीत विजय मिळविला. 2006 सालीही ते दुसऱ्यांदा विजयी झाले. या काळात गुप्ता यांचा अमरावती विभागाच्या ग्रामीण भागात जनसंपर्क निर्माण झाला. त्यांच्या कारकीर्दीत महापालिकेवर भाजपने सत्ताही काबीज केली आहे.
त्यानंतर मात्र भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी गुप्ता यांचे मतभेद झाले आणि ते पक्षापासून दूर होत गेले. अखेर पक्षशिस्तीचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवून गुप्ता यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. 2012 च्या महापालिका निवडणुकीत गुप्ता यांनी काँग्रेसमधून निलंबित झालेल्या डॉ. सुनील देशमुख यांच्यासोबत मिळून जनकल्याण-जनविकास आघाडीची स्थापना केली. या आघाडीला केवळ सात जागा मिळवता आल्या होत्या.
महापालिका निवडणुकीत फारसे यश न मिळाल्याने जगदीश गुप्ता यांचा भ्रमनिरास झाला. तेव्हापासून ते सक्रिय राजकारणापासून अलिप्त राहू लागले. पण, मागच्या काही वर्षांत ते भाजपच्या वर्तुळात सहभागी पुन्हा सक्रिय झाले होते. त्यांच्याकडे कुठलेही पद नव्हते पण त्यांचा गट टिकून होता. सक्रिय झाल्यानंतर पुन्हा उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती.
पण 2019 मध्ये भाजपने सुनील देशमुख यांना उमेदवारी दिली आणि गुप्ता पुन्हा नाराज झाले. नोव्हेंबर 2021 मध्ये अमरावतीत उसळलेल्या दंगल प्रकरणी जगदीश गुप्ता यांच्यासह भाजप, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या अनेक कार्यकर्त्यांना अटक करण्यात आली होती. तेव्हा जगदीश गुप्ता यांचे नाव राजकीय चर्चेत आले होते.
2024 मध्ये देखील गुप्ता उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक होते. पण युतीमध्ये अमरावती शहर मतदारसंघाची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला गेली. त्यामुळे त्यांनी बंडाचा झेंडा फडकावित अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. पक्षशिस्तीच्या कारणावरून त्यांचे दुसऱ्यांदा निलंबन झाले. पण तरीही भाजपमधील नाराज गटाच्या साथीने त्यांनी निवडणुकीत 30 हजारावर मते घेत शहरातील त्यांचे वर्चस्व सिद्ध केले.
विद्यमान स्थितीत ते कोणत्याच पक्षात नाहीत. पण त्यांचा गट आजही टिकून आहे. भाजपमध्ये अनाहूतांना पक्षप्रवेश देत सन्मानाची पदे दिली जातात. पण पक्षासाठी कष्ट घेतलेल्या नेत्यांना दाराबाहेर ठेवले जाते ही त्यांची नाराजी आहे. गुप्ता यांना पुन्हा प्रवेशाची संधी मिळणे अपेक्षित होते. मात्र मूळ कार्यकर्त्यांना बाहेर ठेवून इतर पक्षातील नेत्यांना प्राधान्य देत असल्याने नाराज असलेला गट गुप्ता यांच्यासोबत आहे.
आगामी महापालिकेच्या निवडणुकीत भाजपसाठी हा गट नुकसानदायक ठरण्याची शक्यता आहे. तर शहरात अस्तित्व नसलेल्या शिवसेनेला मात्र बळकटी येणार आहे. गुप्ता यांच्यारुपाने शिंदे यांना मोठा चेहरा मिळाल्याची चर्चा आहे. अद्याप अमरावतीत प्रवेश होणार की मुंबईत हे निश्चित झालेले नाही. मात्र निर्धार पक्का झाला आहे, असे गुप्ता यांच्या समर्थकांनी म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.