Nagpur News : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीची तयारी सर्वच पक्षांकडून केली जात आहे. महायुती व महाविकास आघाडीचे जागावाटपाची चर्चा अंतिम टप्प्यात आली आहे. त्यातच आता जागावाटपात काही मतदारसंघात अदलाबदली केली जाणार का याची उत्सुकता लागली आहे. विशेषतः काटोल मतदारसंघावरून चर्चा रंगली आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या मतदारसंघावर त्यांचे पुत्र, जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख तसेच काँग्रेसचे नेते स्व. श्रीकांत जिचकार यांचे पुत्र याज्ञवल्क्य जिचकार यांनी दावा केला आहे. त्यामुळे कुठून लढतील अशी विचारणा सातत्याने होत आहे. महाविकास आघाडीनेसुद्धा मेरिटनुसार काही जागांची अदलाबदली करण्याचा निर्णय घेतला आहे. यात विदर्भातीलसुद्धा काही जागांचा समावेश आहे. (Anil Deshmukh News)
या अदलाबदलीत काटोल विधानसभा मतदारसंघाचाही समावेश आहे का ? अशी विचारणा त्यांना केली असता अनिल देशमुख यांनी हसून उत्तर देण्याचे टाळले. आज ते वर्धा लोकसभा मतदारसंघातील अपघातात मृत्य पावलेल्या कुटुंबीयांचे शिष्टमंडळ घेऊन आले होते. यावरून देशमुखांच्या काटोलच्या अदलाबदलीच्या चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे.
अनिल देशमुख, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. त्यावरून ते फडणवीस यांच्या दक्षिण-पश्चिम मतदारसंघातून लढणार असल्याची चर्चा सुरू होती. आता ते वर्धा जिल्ह्यातील आर्वी विधानसभा मतदारसंघाच्या संपर्कात जास्त असल्याचे समजते. हा मतदारसंघ वर्धा लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार अमर काळे यांचा आहे.
शरद पवार यांनी खासदार काळे यांना काँग्रेसमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आयात केले होते. त्यांचा आर्वी विधानसभा मतदारसंघ काँग्रेसकडे आहे. वर्धा लोकसभा मतदारसंघातील मोर्शी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आहे. सलील देशमुख मोर्शीतून इच्छुक असल्याचीही चर्चा रंगली आहे. या सर्व राजकीय घडामोडी बघता महाविकास आघाडीमध्ये काही मतदारसंघाची अदलाबदली होणार असल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे अनिल देशमुख सुमारे पंचेवीस वर्षांपासून काटोल-नरखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. ते सहजासहजी आपला मतदारसंघ सोडणार नाही. सलील देशमुख यांना येथून उमेदवारी दिली तरच ते शक्य आहे. अशा परिस्थितीत ते आर्वी विधानसभा मतदारसंघात जाऊ शकतात. दुसरीकडे याज्ञवल्क्य जिचकार यांच्यासाठी काँग्रेसने जोरदार फिल्डिंग लावली आहे. त्यांचे वडील स्व. श्रीकांत जिचकार येथील आमदार होते.
याज्ञवल्क्य यांनी प्रचारालासुद्धा सुरुवात केली आहे. आपल्याला काँग्रेसच्या नेत्यांनी लढण्यास सांगितले आहे, असा त्यांचा दावा आहे. मतदारसंघाच्या अदलाबदलीच्या चर्चेला विविध राजकीय पक्षांनी केलेल्या सर्वेचाही दाखला दिला जात आहे. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस आणि भाजपनेही या मतदारसंघाचा सर्वे केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.