Nagpur News: राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूर जिल्ह्यातील काटोल-नरखेड विधानसभा (Katol Assembly Election) मतदारसंघावर आपला दावा ठोकला केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन सन्मान यात्रा कार्यक्रम घेऊन अजित पवार यांनी महायुतीच्या जागा वाटपापूर्वीच आपला हक्क सांगून टाकला.
भाजपचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले असताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी मिळालेल्या वेळेत अनेक इच्छुकांची झाडाझडती घेतली. काहींना अप्रत्यक्षपणे कामाला लागण्याचे निर्देश दिले. यापुढे मागे मागे राहून चालणार नाही, प्रत्येक कार्यक्रमाची जबाबदारी घेण्यासही स्थानिकांना सांगितले.
जन सन्मान यात्रेचा कोटलमधील कार्यक्रम चांगलाच यशस्वी झाला. अपेक्षित गर्दी झाली होती. त्यामुळे दादा खुश झाले. शनिवारी रात्री त्यांचा मुक्काम नागपूरमध्येच होता. रविवारी ते यवतमाळला जाणार होते. मात्र अतिवृष्टीमुळे हा कार्यक्रम रद्द झाल्याने दादांनी काटोलमधील काही लोकांना चर्चेसाठी विजयगड बंगल्या बोलावून घेतले होते. काटोलची राजकीय परिस्थिती जाणून घेतली.
न्याय हक्क कार्यक्रमाला कोणी कोणी मदत केली, खर्च कोणी केला याची माहिती जाणून घेतली. निवडणूक लढण्यास कोण कोण इच्छुक आहेत, याची विचारणा केली. यापैकी दोन ते तीन जणांना त्यांनी आपल्या कक्षात बोलावून घेतले व सविस्तर चर्चा केली. आपल्या स्वीय सहायक व सुरक्षा रक्षकालासुद्धा बाहेर जाण्यास सांगितले होते.
सर्व घडामोडी सुरू असताना अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी विजय गडच्या प्रतीक्षा कक्षात बसून होते. एक माजी केंद्रीयमंत्री काटोल विधानसभा मतदारसंघात लढण्यास इच्छुक आहे. अजित पवार यांनी मात्र त्यांना चर्चेसाठी बोलावले नव्हते. यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यावरून दादांच्या मनात कोणी दुसराच उमेदवार असल्याचे बोलले जात आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख काटोलचे आमदार आहेत. सोबतचे त्यांचे पुत्र जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख हेसुद्धा येथूनच लढण्यास इच्छुक आहेत. भाजपमधून डझनभर इच्छुकांनी दावेदारी केली आहे. यात माजी आमदार आशिष देशमुख, चरणसिंग ठाकूर, अविनाश ठाकरे आदींचा समावेश आहे. शिवसेनेकडून किरण पांडव, राजू हरणे आणि सतीश शिंदे यांनी अनिल देशमुख यांच्या विरोधात निवडणूक लढली आहे. सतीश शिंदे आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.