
Amravati News : माजी आमदार बच्चू कडू पुन्हा आक्रमक झाले आहेत. शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा यासाठी प्रहार जनशक्ती पार्टीच्यावतीने परतवाडा-अमरावती मार्गावर टायर जाळून रस्ता जाम केला. त्यामुळे या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. यावेळी कडू यांनी आता चर्चेचे दारे बंद झाले असून मंत्रालयात घुसण्याचा इशारा दिला आहे.
कडू यांनी यापूर्वी कर्जमाफीसाठी सात दिवस आमरण उपोषण केले होते. राज्याचे महसूलमंत्री आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांना राज्य शासनाने समजूत काढण्यासाठी पाठवले होते. मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या संदर्भात एक समिती स्थापन करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर कडू यांनी उपोषण आंदोलन स्थगिती केले होते. पावसाळी अधिवेशनाच्या दरम्यान कडू यांनी पुन्हा पदयात्रा काढून याच अधिवेशनात कर्जमाफी करण्याची घोषणा केली होती. अधिवेशन आटोपल्यानंतरही कर्जमाफी झाली नसल्याने कडू यांनी पुन्हा आंदोलनाचे अस्र उभारले आहे.
आजपासून त्यांनी राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. अमरावती जिल्ह्यातील परतवाड येथून आंदोलनाला सुरुवात झाली. प्रहार संघटनेच्या आंदोलनात शेतकरी, शेतमजूर, दिव्यांगांसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत. यावेळी कडू यांनी यापुढे वेळ न घेताच मंत्रालयात घुसण्याचा इशारा दिला.
कर्जमाफीसाठी एक समिती स्थापन केली. मात्र याची अध्यक्षांना माहिती नाही. आतापर्यंत राज्य सरकारला पुरेसा वेळा दिला. गांधीगिरी केली. मात्र आता भगत सिंह यांच्याप्रमाणे लढा दिला जाईल. हे आंदोलन फक्त ट्रेलर आहे. २९ जुलैला वसंतराव नाईक यांच्या समाधीस्थळी यापेक्षा मोठे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला.
बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी पदयात्रा सुरू केल्यानंतर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना नौटंकी असे संबोधले होते. समिती स्थापन करण्याच्या संदर्भात कडू यांच्याशी मंत्रालयात चार तास चर्चा झाली. कर्जमाफी कशी करायची, कोणाला द्यायची याबाबत बोलणी झाली होती, असे त्यांनी सांगितले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्यवेळी कर्जमाफी दिली जाईल असे जाहीर केले होते. कडू यांनी शेतकरी आत्महत्या करीत असल्याने हीच कर्जमाफीची योग्य वेळ असल्याचा दावा केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.