
Nagpur Congress: महायुती सरकारने काढलेल्या हैदराबाद गॅझेट जीआरच्या विरोधात उद्या शुक्रवारी (ता.१०) सकल ओबीसी समाजाच्यावतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे. मात्र त्यांनी या मोर्चाचे नेतृत्व आपण करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे, असे असले वडेट्टीवारांच्या पुढाकाराने काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये सुप्त संघर्ष असल्याचे दिसून येते. त्यामुळे या मोर्चात काँग्रसचे विदर्भातील कोण कोण नेते सहभागी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मोर्चाच्या पूर्व तयारीसाठी वडेट्टीवार यांनी जिल्हानिहाय बैठका घेतल्या. भंडारा जिल्ह्यातील बैठकीला काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उपस्थित नव्हते. काँग्रेसचे नेते व माजी मंत्री सुनील केदार यांचे नागपूर ग्रामीणमध्ये वर्चस्व आहे. ते आणि त्यांचे कट्टर समर्थक एकाही बैठकीत दिसले नाहीत. नागपूर ग्रामीणमधील बहुतांश कार्यकर्ते केदारांच्या शब्दाबाहेर कोणी जात नाही. माजी मंत्री नितीन राऊत आणि माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक हे या मोर्चापासून अंतर राखून आहेत.
विजय वडेट्टीवार यांनी मोर्चाची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व ओबीसी नेत्यांची बैठक मुंबईला बोलावली होती. त्यात राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनाही निमंत्रण देण्यात आले होते. मात्र, त्यांच्या नावाला विरोध करण्यात आला. त्यांना बोलावण्यात येणार असले तर आम्ही बैठकीला येणार नाही असा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर तायवाडे यांचे नाव वगळण्यात आले. तायवाडे यांनी हैदराबाद गॅझेटमुळे ओबीसी समाजाचे नुकसान होणार नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. त्यावरून वडेट्टीवारांनी ते भाजपकडे झुकले आहेत, त्यांची भूमिका बदलली असा आरोप केला होता.
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे नागपूरच नव्हे तर संपूर्ण विदर्भात मोठे नेटवर्क आहे. दोन ऑक्टोबरला संविधान सत्याग्रह यात्रा नागपूर ते सेवाग्राम अशी यात्रा काढण्यात आली होती. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यासाठी दोन दिवस नागपूरमध्ये मुक्कामी होते. या दरम्यान त्यांनी दोन ते तीन वेळा पत्रकारांसोबत संवाद साधला. महायुती सरकार व संघावर प्रखर टीका केली. मात्र ओबीसी समाजाच्या मार्चाबाबत एकही शब्दही त्यांनी उच्चारला नाही. काँग्रेसच्या कार्यकारिणीत असलेले विदर्भातील ओबीसी नेते सकल ओबीसी समाजाच्यावतीने घेण्यात आलेल्या बैठकांमध्ये आले नाहीत. शहर काँग्रेसचे अध्यक्ष आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी यांचा अपवाद वगळता इतर बडे नेते आजवर दिसले नाही. त्यामुळे उद्याचा मोर्चात कोण कोण सहभागी होतात याकडे सर्वांच्या नजरा राहणार आहे.
विजय वडेट्टीवार यांनी या मोर्चात ओबीसी समाज लाखोंच्या संख्येने होणार असल्याचा दावा केला आहे. ओबीसीच्या प्रश्नावर लढणाऱ्या प्रत्येकाने यात सहभागी व्हावे. हा मोर्चा माझ्या नेतृत्वात नाही. ज्या कुणाला ओबीसीच्या प्रश्नावर लढण्याची इच्छा आहे त्यांनी या मोर्च्यात सहभागी व्हावे असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे. महायुती सरकारने २ सप्टेंबरचा शासन निर्णय रद्द करावा ही प्रमुख मागणी या मोर्च्याच्या माध्यमातून केली जाणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.