Nagpur News: नागपूर जिल्ह्यात काँग्रेसच्या तीन बंडखोर उमेदवारांनी महाविकास आघाडी आणि महायुतीचे टेन्शन चांगलेच वाढवले आहे. यापैकी किमान दोन मतदारसंघात आघाडी किंवा युतीला जोरदार धक्का बसणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.
रामटेक विधानसभा मतदारसंघात काँग्रेसचे (Congress) जिल्हाध्यक्ष व माजी मंत्री राजेंद्र मुळक यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, काटोल विधानसभा मतदारसंघातून याज्ञवल्क्य जिचकार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची तुतारी आणि भाजप तर पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघातून नरेंद्र जिचकार यांनी काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांच्यासमोर मोठे आव्हान उभे केले आहे. तिघांचाही प्रचार धडाक्यात सुरू आहे. त्यांच्या सभा आणि प्रचार यात्रांना चांगलीच गर्दी होत आहे. त्यामुळे या तीनही मतदारसंघात धक्कादायक निकालाची नोंद होणार असल्याचा अंदाज वर्तविली जात आहे.
राजेंद्र मुळक यांना काँग्रेसच्या नेत्यांनी उघडपणे पाठिंबा दर्शवला आहे. जिल्ह्यातील नेते त्यांच्यासोबत प्रचारात फिरत आहेत. येथे त्यांची लढत शिवसेनेचे (Shivsena) आशिष जयस्वाल आणि उद्धव सेनेचे विशाल बरबटे यांच्याशी होत आहे. या मतदारसंघातील भाजप, उद्धव व शिंदे सेनेचे नाराज कार्यकर्ते मुळकांनी आपल्याकडे वळवले आहेत. त्यामुळे रामटेकमध्ये काहीही होऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.
पश्चिम नागपूरमध्ये नरेंद्र जिचकार यांना कमी लेखने काँग्रेसला महागात पडू शकते. त्यांची बॅट येथे चौफेर फटकेबाजी करीत आहे. मागील निवडणुकीत काँग्रेस आणि भाजपच्या (BJP) विजयाचे अंतर अवघ्या पाच हजार मतांचे होते. नरेंद्र जिचकार यांच्या उमेदवारीने दोन्ही उमेदवारांना धडकी भरली आहे. दोन्ही पक्षाचे नाराज कार्यकर्ते त्यांना छुपी मदत करीत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नरेंद्र जिचकार कोणाची विकेट घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
काटोलमध्ये राष्ट्रवादीचे सलील देशमुख आणि भाजपचे चरणसिंग ठाकूर यांच्या लढतीत काँग्रेसचे बंडखोर याज्ञवल्क्य जिचकार यांनी उडी घेऊन ती तिहेरी केली आहे. कुठल्याही वादाचा आणि गटबाजीचा ठपका त्यांच्यावर नाही. हीच सध्या त्यांची जमेची बाजू मानली जात आहे. ज्यांना भाजपचा आणि राष्ट्रवादीचा उमेदवार चालत नाही त्यांच्यासाठी जिचकार यांचा पर्याय काटोलमध्ये उपलब्ध आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.