
Nagpur local body elections : नागपूर जिल्हा परिषदेच्या सर्कलचे प्रारुप जाहीर होताच राजकीय वर्तुळात उत्साह निर्माण झाला आहे. कुठले सर्कल सोयीच व गैरसोयीचे याचे आडाखे बांधणे सुरू झाले आहे.
जिल्हा परिषदेच्या राजकारणात 2002ची बॅच चांगलीच गाजली होती. या बॅचचे सदस्य चंद्रशेखर बावनकुळे कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाले. दोन सदस्य आमदार झाले. मात्र त्यावेळी या सर्वांचे तुलनेत पदाने मोठे असलेल्या नेत्यांना मात्र विधानसभा गाठता आली नाही. त्यापैकी काही पुन्हा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सक्रिय होणार असल्याची चर्चा आहे.
2002मध्ये काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूर (Nagpur) जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतली होती. काँग्रेसच्या सुनिता गावंडे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष झाल्या. काँग्रेसचे विद्यमान जिल्हाध्यक्ष बाबा आष्टणकर त्यावेळी सत्तापक्षनेते तर बावनकुळे विरोधी पक्षनेते होते.
त्यावेळी जिल्हा परिषदेत माजी उपाध्यक्ष रमेश मानकर, विजय घोडमारे, सुधीर पारवे, सतीश शिंदे, ज्ञानेश्वर साठवणे, बंडोपंत उमरकर, शेखर कोल्हे, श्यामदेव राऊत, शंकर चहांदे आदी नेते होते. अडीच वर्षांचा कार्यकाळ आटोपल्यानंतर बावनकुळे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत उडी घेतली आणि पहिल्याच प्रयत्नात ते आमदार झाले. त्यांच्या रिक्त झालेल्या जागेवर भाजपने (BJP) सुरेश भोयर यांना उमेदवारी दिली होती.
विधानसभेच्या निवडणुकीत सुनिता गावंडे यांनी हिंगणा विधानसभा मतदारसंघातून बंडखोरी केली होती. यात त्या अपयशी ठरल्या. नंतरच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेसने बावनकुळे यांच्या विरोधात कामठी विधानसभा मतदारसंघातून लढवले होते. अशोक चव्हाण राज्याचे मुख्यमंत्री होताच सुरेश भोयर भाजपातून बाहरे पडले. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले.
यानंतर बावनकुळे यांच्याच विरोधात ते दोन वेळा विधानसभेत लढले. मात्र बावनकुळे यांच्यासमोर कोणाचाच निभाव लागला नाही. सावनेर विधानसभा मतदारसंघावर दावा असलेले तत्कालीन जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रमेश मानकर यांची संधी विद्यामान आमदार आशिष देशमुख यांनी हिरावून घेतली. तत्कालीन कृषी सभापती सतीश शिंदे यांनी शिवसेनेते प्रवेश केला. अनिल देशमुख यांच्या विरोधात ते लढले. बंडोपंत उमरकर, ज्ञानेश्वर साठवणे यांचे अकाली निधन झाले.
जिल्हा परिषदचे शिक्षण सभापती विजय घोडमारे यांनी हिंगणा विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री रमेश बंग यांना पराभूत केले. त्यांचेच भाजपचे सहकारी सुधीर पारवे हेसुद्धा उमरेड विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत दाखल झाले. घोडमारे यांच्याऐवजी भाजपने समीर मेघे यांना उमेदवारी दिली. त्यानंतर घोडमारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
मात्र त्यांना मेघे यांना पराभूत करता आले नाही. दोन वेळा आमदार राहिलेल्या सुधीर पारवे यांना राजू पारवे यांनी पराभूत केले. रमेश मानकर, बाबा आष्टणकर, सतीश शिंदे यांची राजकीय कारकीर्द त्यांचे सर्कल सातत्याने आरक्षित झाल्याने संपुष्टात आली होती. आता या सर्वांना पुन्हा जिल्हा परिषदेत परतीचे वेध लागले आहेत. मात्र या सर्वांचे राजकीय भवितव्य आरक्षणावर अवलंबून राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.