
Nagpur News : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जिल्ह्यातील जिल्हा परिषदेचे सर्कल जवळपास निश्चित झाले आहेत. सर्व सर्कल आणि त्या अंतर्गत येणाऱ्या गावांच्या नावांची प्रारूप यादी आज जाहीर करण्यात आली. 58 सदस्यांची जिल्हा परिषदेत आता एका मतदारसंघाची घट झाली आहे.
विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी माजी मंत्री व काँग्रेसचे नेते सुनील केदार (Sunil Kedar) सक्रिय झाले आहेत. त्यांना थोपवण्याचे आव्हान भाजप आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासमोर राहणार आहे. ग्रामीण भागात केदारांचे आजही वर्चस्व आहे. खासदार काँग्रेस महाविकास आघाडीचा आहे. दुसरीकडे सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे आमदार आहेत. यात बावनकुळे आणि आशिष जयस्वाल मंत्रिमंडळात आहेत.
नगरपालिका आणि नगर पंचायतींच्या संख्येत वाढ झाल्याने नागपूर ग्रामीण, भाजपचे (BJP) हिंगणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर मेघे आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कामठी विधानसभा मतदारसंघातील प्रत्येकी एक असे तीन जिल्हा परिषदेचे सर्कल कमी झाले आहेत.
दुसरीकडे सावनेर विधानसभा मतदारसंघात एक आणि उमरेड विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक जिल्हा परिषद सर्कलची वाढ झाली आहे. सावनेर विधानसभा मतदारससंघात यापूर्वी सहा जिल्हा परिषदेचे सर्कल होते. ते आता सात झाले आहेत. उमरेड विधानसभा मतदारसंघांतंर्गत येणाऱ्या भिवापूर तालुक्यात पूर्व दोन सर्कल होते. ते आता तीन झाले आहेत.
सध्या प्रसिद्ध करण्यात आलेले मतदारसंघाचे प्रारूप आहे. 21 जुलैपर्यंत यावर आक्षेप नोंदवून घेतले जाणार आहे. अंतिम यादी 11 ऑगस्टला जाहीर करण्यात येणार आहे. प्रारूप यादी आणि अंतिम यादीत किरकोळ बदल होत असतात. हे बघता जिल्हा परिषदेचे सर्व सर्कल जवळपास निश्चित मानले जात आहे. एकूण 58 सदस्यांच्या जिल्हा परिषदेत 10 अनुसूचित जातीजमाती 7 अनुसूचित जाती आणि 12 मतदारसंघ ओबीसींसाठी राखीव राहणार आहे.
राखीव पैकी एक मतदारसंघात लोकसंख्येनुसार अदलाबदल होऊ शकते. एससी किंवा एसटीचा एक मतदारसंघ कमी झाल्यास तो ओबीसी समाजाला मिळू शकतो. उर्वरित 28 मतदारसंघ सर्वांसाठी खुले राहतील.
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना जिल्हा परिषदेची निवडणूक झाली होती. त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यातून हिसकावून घेतली होती.केदार आणि अनिल देशमुख यांनी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचे नेतृत्व केले होते.
आता राज्यात महायुतीचे सरकार आहे. केदार आणि देशमुख आमदार नाहीत. चंद्रशेखर बावनकुळे नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. भाजपने जिल्हा परिषदेचे निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दोन जिल्हाध्यक्ष नियुक्त केले आहेत.
प्रत्येक जिल्हाध्यक्षांकडे प्रत्येकी तीन-तीन विधानसभा मतदासंघ सोपवले आहेत. दुसरीकडे विधानसभेच्या निवडणुकीत पराभवाचा वचपा काढण्यासाठी सुनील केदार सक्रिय झाले आहेत. त्यांना थोपवण्याचे मोठे आव्हान भाजपसमोर राहणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.