Congress News : काँग्रेसच्या दिग्गज नेत्याची 'तलवार पुन्हा म्यानात' : विजय वडेट्टीवारांनी अचानक घेतलेल्या यू-टर्नची Inside Story

Congress News :चंद्रपूर काँग्रेसमधील प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्यातील दीर्घ संघर्ष संपवण्याचे संकेत मिळाले आहेत.
Pratibha Dhanorkar vs Vijay Wadettiwar
Pratibha Dhanorkar vs Vijay WadettiwarSarkarnama
Published on: 
Updated on: 

- प्रमोद काकडे

Congress : खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यातील प्रदीर्घ राजकीय संघर्षाला अखेर ब्रेक लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी डॉ. सिरिवेल्ला प्रसाद यांच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने आमदार वडेट्टीवार यांनी एकत्र येण्याची भूमिका मांडली. त्याला प्रतिसाद देताना धानोरकर यांनीही सकारात्मक संकेत दिले. मात्र, ‘एकीची भाषा कृतीतून दिसायला हवी, ’ असा सूचक संदेश दिला. पण आजवरच्या अनुभवामुळे मात्र ही एकी किती काळ टिकणार, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये मात्र साशंकता आहे.

दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या हयातीतच वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्यातील राजकीय संघर्षाला सुरुवात झाली होती. त्यांच्या निधनानंतर लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून हा संघर्ष अधिकच तीव्र झाला. प्रतिभा धानोरकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आणि त्या विक्रमी मतांनी विजयी झाल्या. त्यानंतरही दोन्ही गटांतील शीतयुद्ध पूर्णपणे थांबले नाही. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही नेते पुन्हा एकत्र आले. त्यामुळे संघर्षावर पडदा पडल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र, ही एकी अल्पजीवी ठरली.

चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत दोन्ही गटांतील मतभेद पुन्हा उफाळून आले. २७ जागांसह काँग्रेस सर्वांत मोठा पक्ष ठरला असतानाही पक्षाला महापालिकेत सत्ता स्थापन करता आली नाही. त्यानंतर दोन्ही गटांतील संघर्ष थेट दिल्लीपर्यंत पोहोचला. दिल्लीतील हस्तक्षेपानंतर काही प्रमाणात तोडगा निघाला. मात्र, स्थायी समिती सदस्यांच्या नियुक्तीवरून पुन्हा मतभेद निर्माण झाले. धानोरकर समर्थकांना डावलले. त्यानंतर वडेट्टीवार गटनेत्याला हटवून धानोरकर समर्थक सुरेंद्र अडबाले गटनेते झाले. गटनेता बदलण्याच्या संघर्षाचे पडसाद पोलिस ठाणे आणि न्यायालयापर्यंतही उमटले.

Pratibha Dhanorkar vs Vijay Wadettiwar
Congress news : महाराष्ट्रातील काँग्रेसच्या दोन दिग्गज नेत्यांमधील राजकीय भांडण मिटलं; दिल्लीतून आलेल्या नेत्यांसमोरच नाव घेत केलं जाहीर...

दरम्यान, वडेट्टीवार आपल्या विधानसभा मतदारसंघात हस्तक्षेप करीत असल्याच्या तक्रारी खासदार धानोरकर यांनी पक्षश्रेष्ठींकडे केल्याची चर्चा होती. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी खासदार धानोरकर ब्रह्मपुरीत एका मेळाव्याला गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या भाषणातील एका वक्तव्याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा झाली होती.

अलीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वडेट्टीवार यांच्या मतदारसंघातील बहुतांश नगरसेवक भाजपच्या गळाला लागल्याने काँग्रेससमोरील आव्हान अधिक वाढले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी खासदार धानोरकर यांनी पुन्हा ब्रह्मपुरीत एका कार्यक्रमाला उपस्थिती लावली. गडचिरोलीचे माजी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे यांनीही ब्रह्मपुरी आणि चिमूर विधानसभा मतदारसंघात जनसंपर्क वाढविण्यास सुरुवात केली आहे.

Pratibha Dhanorkar vs Vijay Wadettiwar
Gujarat Congress Return : ‘बापू’ पुन्हा काँग्रेसच्या वाटेवर? गुजरातच्या राजकारणात मोठी हालचाल

दुसरीकडे आमदार बंटी भांगडिया आणि वडेट्टीवार यांच्यातील राजकीय संघर्षही तीव्र झाला आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांना राजकीयदृष्ट्या चहूबाजूंनी आव्हान निर्माण होत असल्याचे चित्र आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रभारींच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्ताने वडेट्टीवार यांनी धानोरकर यांच्यासोबत एकत्र येण्याची भूमिका मांडली. या आवाहनाला धानोरकर यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला असला, तरी केवळ वक्तव्यांपेक्षा प्रत्यक्ष कृतीतून एकी दिसून यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.

काँग्रेस पक्षाला पुढे जायचे असेल, तर आपसातील भांडणे मिटवावी लागतील. चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यासोबतचा संघर्ष संपला आहे. आता आम्ही सर्वजण सोबत जाऊन काँग्रेसला गतवैभव प्राप्त करून देऊ, असा आशावाद वडेट्टीवार यांनी व्यक्त केला. तर पक्षातील मतभेद मिटत असतील, तर ही चांगली गोष्ट आहे. सर्वांना एकत्र येऊन विरोधकांशी लढायचे आहे. मात्र, एकीची भाषा केवळ भाषणापुरती नको. एकत्र येण्याचा प्रयत्न पुढील काळात कृतीतून दिसेल, ही अपेक्षा आहे, असे धानोरकर म्हणाल्या.

आता दोन्ही नेत्यांमधील ही नवी राजकीय जवळीक प्रत्यक्षात किती पुढे जाते आणि आगामी काळात ती टिकते का, याकडे काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Pratibha Dhanorkar, Vijay Wadettiwar
Pratibha Dhanorkar at BJP Dahi Handi Event
Chandrapur Congress Crisis | Vijay Wadettiwar and Pratibha Dhanorkar Groups
Vijay Wadettiwar
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com