

Amravati News : रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील साई डोंगर वनक्षेत्रात सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. टोरेंट कंपनीच्या प्रस्तावित प्रकल्पावरून जिल्ह्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आमनेसामने आलेले असतानाच, भाजपमधूनही या प्रकल्पाला विरोधाचे सूर उमटू लागले आहेत. वृक्षतोडीच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सचिव ऋषिकेश जोशी यांनी पक्षाचा राजीनामा देण्याचा निर्णय सोशल मीडियावर जाहीर केला होता. त्यांच्यासोबत मिनेश मसने यांनीही राजीनामा देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात या घडामोडींची जोरदार चर्चा सुरू झाली होती.
एकीकडे टोरेंट प्रकल्पामुळे कर्जतच्या निसर्गसंपन्न परिसराचे मोठे नुकसान होण्याची भीती स्थानिक नागरिक आणि पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, अमरावतीतील भाजपचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे या प्रकल्पावरून सरकारची बाजू घेताना दिसत आहेत. यामुळे भाजपचे खासदार अनिल बोंडे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार अनंत गुढे यांच्यात या प्रकल्पावरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
भाजप खासदार अनिल बोंडे यांनी प्रकल्पाच्या विरोधकांवर निशाणा साधताना, “अल निनोच्या संकटापेक्षाही विरोधी पक्षाच्या अज्ञानाचे संकट मोठे आहे,” असा टोला लगावला. कर्जत येथील प्रस्तावित प्रकल्पाचा आपण अभ्यास केला असून, हा ग्रीन प्रकल्प असल्याचा दावा त्यांनी केला. या प्रकल्पावर विनाकारण आरोप केले जात आहेत. भविष्यात विजेची गरज भासणारच आहे, अशी भूमिकाही बोंडे यांनी मांडली.
दरम्यान, माजी खासदार अनंत गुढे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. अल निनोचा प्रभाव संपूर्ण जगावर जाणवत असताना सरकार एकीकडे दुष्काळाची परिस्थिती असल्याचे सांगत आहे, तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड आणि जंगलतोड सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली जात असून, ३०० ते ४०० वर्षे जुनी झाडेही तोडली जात असल्याचा दावा गुढे यांनी केला. या वृक्षतोडीला सरकारच जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला.
एकीकडे अनिल बोंडे यांनी साई डोंगरातील प्रस्तावित प्रकल्पाला ग्रीन प्रकल्प ठरवत त्याचे समर्थन केले आहे, तर दुसरीकडे अनंत गुढे यांनी वृक्षतोडीवरून सरकारला धारेवर धरले आहे. त्यामुळे साई डोंगर वनक्षेत्रातील वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, टोरेंट प्रकल्पाच्या पर्यावरणीय परिणामांवरून राजकीय वाद अधिक चर्चेत आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.