रामटेकचे अपक्ष आमदार व खनिकर्म विकास महामंडळाचे अध्यक्ष आशिष जयस्वाल यांनी सर्वच पक्षापासून अंतर राखून ठेवले आहे. ते मुख्यमंत्री शिंदेसोबत असल्याचे दर्शवतात तर दुसरीकडे भाजपसोबतही त्यांचे सलोख्याचे संबध ठेवून आहेत. ते विधानसभेच्या निवडणूक कुठल्या पक्षातून लढणार याची कोणालाच शाश्वती नाही.
यातच रामटेकच्या विकासासाठी देण्यात आलेला 250 कोटींचा निधी राज्य शासनाने 'होल्ड'वर ठेवला आहे. त्यामुळे जयस्वाल यांची अवस्था ‘दोन्ही घरचा पाहुणा उपाशी‘ अशी झाली आहे.
जयस्वाल ( Ashish Jaiswal ) हे मूळचे शिवसैनिक. नागपूर जिल्ह्यात शिवसेनेला त्यांनीच विधानसभेत खाते उघडून दिले होते. युती आणि आघाडी तुटल्यानंतर जयस्वाल रामटेकमूधन पराभूत झाले होते. भाजपचे मल्लिकार्जुन रेड्डी निवडणूक आल्यानंतर त्यांचा रामटेकवरचा दावा संपुष्टात आला होता. मागील निवडणूक ते अपक्ष लढले आणि विजयीसुद्धा झाले. महाविकास आघाडीचे सरकार असताना खनिकर्म महामंडळाचे अध्यक्ष झाले. शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर ते महायुतीत सहभागी झाले. त्यांना त्याचे आवडते खनिकर्म विकास महामंडळसुद्धा परत देण्यात आले. आपल्या आमदारांना व संभाव्य उमेदवारांना मोठा निधी देऊन मुख्यमंत्री शिंदे सर्वांना प्रबळ केले.
अलीकडच्या अर्थसंकल्पात रामटेकच्या विकासासाठी 250 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. यादरम्यान शिंदे ( Eknath Shinde ) यांनी अपक्ष आमदारांना अधिकृतपणे प्रवेश घेण्यास सांगितले होते. भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला. मात्र, आशिष जयस्वाल यांनी अद्यापही अधिकृत प्रवेश केला नाही. त्यांनी मुख्यमंत्र्यांनाच 'होल्ड'वर ठेवले आहे. ते शिवसेनेत येणार नाही, असे दिसत असल्याने रामटेकचा विकास निधी 'होल्ड'वर ठेवण्यात आल्याची चर्चा आहे. मात्र, यावर अधिकृतपणे कोणी बोलायला तयार नाही.
विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही जयस्वाल हे एकनाथ शिंदे यांच्या अतिशय जवळ होते. कोरोनाच्या काळात शिंदे यांनी शिवसेनेसह अपक्ष आमदारांना मोठा निधी देऊन आपल्या जवळ केले होते. त्यात जयस्वाल यांचाही समावेश होता. यादरम्यान जयस्वाल यांची खनिकर्म महामंडळाच्या अध्यक्षपदाची मुदत संपली होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांना 'होल्ड'वर ठेवले होते. शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर जयस्वाल पुन्हा महामंडळाचे अध्यक्ष झाले. असे असताना जयस्वाल शिंदे सेनेत अधिकृत प्रवेश का करीत नाही? असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
( Edited By : Akshay Sabale )
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.