

Shivsena Vs BJP : नागपूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपने फक्त 8 जागा देऊन बोळवण केल्याने शिवसेनेत मोठा असंतोष उफाळून आला आहे. यातही 6 जागांवर भाजपने आपल्याच कार्यकर्त्यांना तिकीट दिले. मग 2 जागांवर युती कशासाठी केली? अशी विचारणा संतप्त शिवसैनिक करीत आहे. यातच आता शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सूरज गोजे यांचा भाजपने पद्धतशीर गेम केल्याचे समोर आले आहे.
जिल्हाप्रमुख सूरज गोजे प्रभाग क्रमांक 20 मधून लढण्यास इच्छुक होते. प्रमुख पदाधिकारी असल्याने तिकिटे मिळेलच असे त्यांना वाटत होते. जिल्हाप्रमुख या नात्याने भाजपसोबत झालेल्या बैठका आणि सर्व वाटाघाटींमध्ये ते सहभागी होते. सोमवारी रात्री भाजपने 8 जागा देण्याचा निर्णय घेतला. त्यापैकी 6 जागा भाजपचे उमेदवार लढतील अशी अट टाकली होती. त्यावर कोणीच समाधानी नव्हते.
मंगळवारी (ता.30) उमेदवारी अर्ज दाखल करायच्या शेवटच्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा नितीन गडकरी यांच्या घरी बैठक घेण्यात आली. मात्र तोडगा निघाला नाही. किमान भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसाठी तरी जागा सोडा अशी विनंती करण्यात आली. मात्र तीसुद्धा भाजपने स्वीकारली नाही. भाजपचा प्रस्ताव कोणालाच पटला नाही. त्यामुळे आमदार कृपाल तुमाने, पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव यांच्यासह सर्वजण बैठकीतून निघून गेले.
यानंतर युती तुटल्याची चर्चा शहरभर पसरली. मात्र शिवसेनेच्यावतीने मंत्री आशिष जैस्वाल यांनी भाजपचा 8 जागांचा प्रस्ताव स्वीकारला. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मोठा धक्का बसला. शिवसैनिकांमध्ये मोठा असंतोष उफाळून आला. मात्र या गडबडीत उमेदवारी दाखल करण्याची वेळ निघून गेली होती. पक्षाचे सर्व एबी फॉर्म आमदार जयस्वाल यांच्याकडे होते. त्यामुळे कोणालाच अर्ज भरता आला नाही.
विशेष म्हणजे जिल्हाप्रमुख सूरज गोजे यांनी प्रभाग क्रमांक 20 मधील ज्या जागेवर दावा केला होता तेथे भाजपने युती व्हायच्या आधीच हेमंत ठाकरे यांना एबी फॉर्म देऊन टाकला होता. गोजे यांना भाजपला तिकिटच द्यायचे नव्हते हे यावरून स्पष्ट होते. विशेष म्हणजे महापालिकेची निवडणूक जाहीर झाल्यावर उधारीच्या पैशावरून एका व्यक्तीने पत्रकार परिषद घेतली. त्याच्या सांगण्यावरून गोजे यांच्यावर गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला आहे.
शिवसेनेचे शहरप्रमुख समीर शिंदे, दुसरे शहरप्रमुख धीरज फंदी, महिलाप्रमुख मनीषा पापडकर, अनिता जाधव यांनासुद्धा महापालिकेची निवडणूक लढायची होती. पक्षाकडे तिकीट मागितले होते. मात्र भाजपच्या खेळीने कोणालाच तिकीट मिळाले नाही. तिसरे शहर प्रमुख व माजी नगरसेवक बंडू तळवेकर यांच्या मुलीसाठी भाजपने (BJP) एक जागा सोडली. तळवेकर हे आशिष जयस्वाल यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्यासाठी मंत्र्यांनी भाजपसोबत सर्व तडजोडी केल्याचा आरोप इतर पदाधिकाऱ्यांचा आहे.
विशेष म्हणजे तळवेकर यांच्या पुढाकाराने माजी उपमहापौर रघुनाथ मालीकर यांच्यासह 10 नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यांनाही वाऱ्यावर सोडण्यात आले. पूर्व विदर्भाचे संघटक किरण पांडव यांनीही शेकडो कार्यकर्त्यांना शिंदे सेनेत आणले होते. त्यांचाही विचार करण्यात आला नाही.
यामुळे मोठी नाराज निर्माण झाली आहे. आशिष जयस्वाल यांनी शिवसेनेपेक्षा भाजपला जास्त महत्त्व दिले. नागपूर शहरात शिवसेनेचे (Shivsena) अस्तित्व राहणार नाही अशी कृती केल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला आहे. याची तक्रारही पक्षप्रमुख व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात येणार असल्याचे शहर प्रमुखांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.