
Nagpur, 05 May : नागपूर विभागातील शिक्षण खात्यात झालेल्या बोगस नियुक्त्या, नियमबाह्य मान्यता, शालार्थ आयडी घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांनी एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश दिल्याने अनेक शिक्षण संचालक आणि अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, या प्रकरणात सर्वांचे लक्ष वडेट्टीवार यांनी केलेल्या दाव्याकडे लागले आहे, ते संबंधित आमदाराचे नाव कधी उघड करणार असा सवाल उपस्थित होत आहे.
दरम्यान, काँग्रेस पक्षाचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar ) यांनी घोटाळा उघडकीस आणणाऱ्या चौकशी समितीच्या अध्यक्षालाच भाजपच्या एका आमदाराच्या सांगण्यावरून पोलिसांनी अटक केल्याचा आरोप आठ दिवसांपूर्वी केला होता. आपल्याकडे त्याचे पुरावे येत आहेत. लवकरच संबंधित आमदाराचे नाव उघड करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. मात्र, त्यावर वडेट्टीवार अजूनही बोलायला तयार नाहीत.
या घोटाळ्यात नागपूरमधील (Nagpur) सदर पोलिस ठाण्यात एफआयआर नोंदविण्यात आला आहे. तपासादरम्यान शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांच्यासह इतर तीन अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. चौकशीदरम्यान या अधिकाऱ्यांकडून गंभीर स्वरूपाची माहिती समोर येत असून नागपूरसह राज्याच्या इतर भागातूनही बोगस नियुक्त्या व शालार्थ आयडी घोटाळ्यांबाबत तक्रारी समोर येत आहेत.
या संदर्भात भाजपचे आमदार संदीप जोशी यांनी यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष तपास पथक (एसआयटी) गठीत करण्याची मागणी केली होती. या मागणीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी तपासून कार्यवाही करावी, अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण विभागातील तक्रारींच्या अनुषंगाने संबंधित प्रकरणांची चौकशी सहसंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत करून राज्य सरकारला तातडीने अहवाल सादर करण्याच्या सूचना शिक्षण आयुक्त (महाराष्ट्र राज्य, पुणे) यांना देण्यात आल्या आहेत.
काही शाळा संचालक, शिक्षण विभागातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शिक्षण क्षेत्राला भ्रष्टाचाराचे कुरण बनवून सरकार, शिक्षक व पालकांची फसवणूक केल्याचे निष्पन्न होत आहे. शिक्षण विभागातील हा घोटाळा नागपूर विभागात मर्यादित नसून त्याची व्याप्ती संपूर्ण राज्यभर आहे. ही बाब लक्षात आणून देत प्रकरणाचे गांभीर्य आणि व्याप्ती लक्षात घेता संपूर्ण प्रकरणाची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची आग्रही मागणी आमदार संदीप जोशी यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
दरम्यान, हा घोटाळा उघड करण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अध्यक्षाला भाजप आमदाराच्या सांगण्यावरून अटक करण्यात आली आहे. आपल्याकडे त्याचे पुरावे येत आहेत. लवकरच संबंधित आमदाराचे नाव उघड करू, असा इशारा वडेट्टीवार यांनी आठ दिवसांपूर्वी दिला होता. मात्र, वडेट्टीवार हे आठ दिवसांनंतरही त्यावर मौन बाळगून आहेत.
Edited By : Vijay Dudhale
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.