Navneet Rana News: ज्यांनी योगदान दिले नाही; त्यांनी स्वप्न बघू नये, असे म्हणत राणांचा ठाकरेंना टोला...

Samruddhi Highway : मी स्वतः पायी चालत कार्यक्रम स्थळापर्यंत आले, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.
Navnit Rana
Navnit RanaSarkarnama

MP Navneet Rana News : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ऐकल्यानंतर जनता विशेष करून युवा वर्ग त्यांच्या बोलण्याने भारावला होता. समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणाचा सोहळा इतका भव्य दिव्य झाला आणि रस्त्यांवर इतकी गर्दी झाली होती, की मी स्वतः पायी चालत कार्यक्रम स्थळापर्यंत आले, असे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

नागपुरातील (Nagpur) लोकार्पण सोहळा संपल्यानंतर त्या माध्यम प्रतिनिधींशी बोलत होत्या. जो जमिनीवर राहून काम करतो, विकास कार्यासाठी ज्यांनी स्वतःचे सर्वस्व पणाला लावले आहे, तोच व्यक्ती असं बोलू शकतो. म्हणूनच मोदींनी (Narendra Modi) ११ प्रकल्पांची माहिती तोंडपाठ दिली. काल लोकार्पण आणि भूमिपूजन झालेल्या ११ प्रकल्पांना त्यांनी ११ नक्षत्रांची उपमा दिली. मेट्रो, समृद्धी महामार्ग आणि त्याची वैशिष्ट्य़े, चंद्रपूरचे (Chandrapur) प्रकल्प याची इत्थंभूत माहिती त्यांनी दिली. नागपूर (Nagpur) ते शिर्डीपर्यंत (Shirdi) सुरू झालेल्या मार्गातील अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. त्यांच्या बोलण्यातील नेमकी हीच बाब जनतेला प्रभावित करून जाते, असे खासदार राणा (Navnit Rana) म्हणाल्या.

यापूर्वीच्या सर्व सरकारांनी विदर्भाकडे दुर्लक्ष केले आहे. पण केंद्र असो किंवा महाराष्ट्र विद्यमान सरकारला विदर्भ आणि मराठवाड्याची काळजी आहे. हे कृतीतून सिद्ध केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे घरी बसून काम करत नाहीत, तर रात्रंदिवस ते जनतेमध्ये असतात. जमिनीवर राहून काम करतात. समृद्धी महामार्गाच्या कामाची सुरूवातही शिंदे-फडणवीसांनी केली आणि त्याचे लोकार्पणही त्यांच्या कार्यकाळात त्यांच्याच उपस्थितीत झाले, ही मोठी गोष्ट आहे. यासाठी भाग्य लागते. विकासाच्या प्रत्येक कामात त्यांचे योगदान आहे आणि ज्याचे काही योगदान आहे, त्यालाच लोकार्पण आणि भूमिपूजन करण्याची संधी मिळत असते. जो काहीच करत नाही, केवळ घरी बसून राहतो, त्याला कधीही अशा प्रकारची संधी मिळत नाही, असे म्हणत नवनीत राणा यांनी उद्धव ठाकरेंना चांगलाच टोला लगावला.

Navnit Rana
Navnit Rana : नवनीत राणा को गुस्सा क्यू आया? पोलिसांवर भडकल्या खासदार राणा !

महाराष्ट्रातल्या जनतेने, शेतकऱ्यांनी आणि युवकांनी जी काही स्वप्ने बघितली आहेत, ती पूर्ण होतील, याची खात्री आहे. जनतेला युवांनाही ही खात्री पटली आहे. गेल्या चार-पाच महिन्यांतच शिंदे-फडणवीस सरकारने कोट्यवधी रुपयांच्या कामांचे लोकार्पण आणि भूमिपूजन केले आणि तेसुद्धा विदर्भ-मराठवाड्यासाठी, ही मोठी गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आगामी २५ वर्षांचे व्हीजन जनतेसमोर मांडले आहे. विदर्भ-मराठवाड्यावर आजवर झालेला अन्याय दूर करण्याचे काम शिंदे-फडणवीस सरकार करीत आहे, याचा मनस्वी आनंद आहे, असे खासदार नवनीत राणा म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com