Tukaram Mundhe : दोनदा नियमांचे उल्लंघन, तरीही अधिकारी ढिम्म; तुकाराम मुंढेंकडून थेट सहाय्यक आयुक्तांचे निलंबन!

Tukaram Mundhe Suspends Wardha Assistant Commissioner : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वर्धा येथील सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रफुल्ल टोपले यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे.
IAS Tukaram Mundhe
IAS Tukaram MundheSarkarnama
Published on: 
Updated on: 

Wardha News : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वर्धा येथील सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रफुल्ल टोपले यांच्यावर तडकाफडकी निलंबनाची कारवाई केली आहे. अन्न सुरक्षा मानकांचे उल्लंघन झाल्याचे तपासणी अहवालातून समोर आल्यानंतरही अपेक्षित कारवाई न करणे, कर्तव्यात कसूर करणे आणि दीर्घकाळ निष्क्रिय राहिल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणात उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर प्रशासनाला कारवाई करावी लागली होती. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत तुकाराम मुंढे यांनी टोपले यांच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित करत त्यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे.

तपासणी अहवालात त्रुटी, तरीही कारवाई नाही!

वर्धा येथील गोरस भांडारची 27 डिसेंबर 2023 रोजी तत्कालीन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी तपासणी केली होती. या तपासणी अहवालात गोरस भांडारला 72 टक्के गुण मिळाले होते. तसेच अन्न सुरक्षा मानकांचे अनुपालन होत नसल्याचा शेरा नोंदवत सुधारणा सूचना बजावण्याची शिफारस करण्यात आली होती.

या अहवालातील त्रुटींचे परीक्षण करून अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, 2006 मधील कलम 32 अंतर्गत सुधारणा सूचना देणे, आवश्यकतेनुसार परवाना निलंबित करणे आणि अन्य अनुषंगिक कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, पदनिर्देशित अधिकारी म्हणून टोपले यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

IAS Tukaram Mundhe
Tukaram Mundhe News: तुकाराम मुंढेंचं एक पाऊल मागे; 'एफएसएसएआय' विरोधात हायकोर्टात दाखल याचिका 'एफडीए' मागे घेणार

दुसऱ्या तपासणीनंतरही कारवाईकडे दुर्लक्ष

18 जून 2025 रोजी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी गोरस भांडारची पुन्हा तपासणी केली होती. त्यावेळीही अन्न सुरक्षा व मानके कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाल्याचे आढळले होते. या कालावधीत टोपले अर्जित रजेवर होते. मात्र, 30 जून 2025 रोजी पुन्हा कामावर रुजू झाल्यानंतर त्यांनी प्रलंबित तपासणी अहवालांचा आढावा घेऊन आवश्यक कारवाई करणे अपेक्षित होते. तरीही त्यांनी अपेक्षित कार्यवाही केली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर प्रशासनाला जाग

या प्रकरणी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल करण्यात आली होती. न्यायालयाने 7 जुलै 2026 रोजी दिलेल्या आदेशात यापूर्वी सुधारणा सूचना बजावण्यात आली नसल्याची बाब नोंदवली होती. न्यायालयाच्या आदेशानंतर 8 जुलै रोजी सुधारणा सूचना बजावण्यात आली. त्यानंतर 27 जुलै रोजी फेरतपासणी आणि पुढील सुनावणीची कार्यवाही करण्यात आली. अधिकाऱ्याच्या दीर्घकालीन निष्क्रियतेमुळे अन्न व औषध प्रशासनाची प्रतिमा मलिन झाली आणि प्रशासनाला कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले, असे निलंबन आदेशात नमूद करण्यात आले आहे.

खुलासा अमान्य; मुंढेंकडून थेट निलंबन

या प्रकरणी टोपले यांना 13 ऑक्टोबर 2026 रोजी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. त्यावर त्यांनी 26 ऑक्टोबर रोजी खुलासा सादर केला होता. मात्र, उपलब्ध कागदपत्रे, संबंधित अधिकाऱ्याची जबाबदारी तसेच तपासणी अहवालांवर दीर्घकाळ कारवाई न केल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांचा खुलासा असमाधानकारक ठरवण्यात आला. त्यामुळे महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियमांतील तरतुदींचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत तुकाराम मुंढे यांनी टोपले यांच्या निलंबनाचे आदेश जारी केले आहेत.

IAS Tukaram Mundhe
Tukaram Mundhe : MPSC पेपरफुटीच्या चौकशी आयोगाचा विद्यार्थ्यांना धक्का : तुकाराम मुंढेंकडून यादी जाहीर; राज्यसेवा परीक्षा वगळली

मुख्यालय सोडण्यासही निर्बंध

निलंबन कालावधीत टोपले यांचे मुख्यालय वर्धा येथील अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय राहणार आहे. कार्यालय प्रमुखांच्या पूर्वपरवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नाही. तसेच सर्व शासकीय कागदपत्रे, तपासणी अहवाल, नोंदवह्या आणि प्रलंबित प्रकरणांची माहिती कार्यालय प्रमुखांकडे तत्काळ हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. चौकशीशी संबंधित पुरावे, शासकीय अभिलेख आणि साक्षीदारांवर कोणत्याही प्रकारे अनधिकृत प्रभाव टाकण्यासही मनाई करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.