

वाशिम जिल्ह्यातील एका गाजलेल्या कोठडी मृत्यू प्रकरणात तब्बल 15 वर्षांनंतर न्यायालयाने ऐतिहासिक निर्णय देत 9 पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळे संपूर्ण महाराष्ट्र पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून, कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याचा स्पष्ट संदेश या निर्णयातून देण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. पोलिस कोठडीत झालेल्या मारहाणीमुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याप्रकरणी हा निकाल देण्यात आला.
वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश जयसिंग झपाटे यांनी हा महत्त्वपूर्ण निकाल सुनावला. रिसोड पोलिस ठाण्यात चोरीच्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या बेग्या पवार या तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. न्यायालयाने या प्रकरणातील पुरावे आणि साक्षीदारांच्या जबाबांचा विचार करून दोषी पोलिस कर्मचाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली.
बेग्या पवार हे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील वाढोणा गावचे रहिवासी होते. ते पारधी समाजातील असून त्यांच्याविरोधात यापूर्वी कोणताही गुन्हा नोंद नसल्याचे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले होते. 10 मे 2011 रोजी त्यांचा पोलिस कोठडीत मृत्यू झाला होता. या घटनेनंतर प्रकरणाचा तपास सुरू झाला आणि अखेर दीर्घ न्यायालयीन प्रक्रियेनंतर निकाल जाहीर करण्यात आला.
या प्रकरणात तत्कालीन पोलिस निरीक्षक महादेव माणिक धांडे यांच्यासह मदन केशव पवार, शिवाजी नामदेव खिल्लारी, पंजाब माणिकराव पाटकर, रमेश सीताराम पवार, प्रकाश हिरालाल तारम, नागोराव भगवान खांडके, अशोक निवृत्ती वैद्य आणि वसंत कणिराम जाधव या 9 पोलिस कर्मचाऱ्यांना दोषी ठरवण्यात आले आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे सोपवण्यात आला होता. सीआयडीने अवघ्या 34 दिवसांत तपास पूर्ण करून संबंधित पोलिसांविरोधात हत्येचा गुन्हा तसेच विशेष ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल केले होते. न्यायालयाच्या निर्णयानंतर बेग्या पवार यांच्या कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, अनेक वर्षांच्या न्यायलढ्याला अखेर यश मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.