वर्धा ः राजकारणाच्या आखाड्यात विरोधकांना चारही मुंड्या चीत करणारे वर्धेचे खासदार रामदास तडस स्वतः कुस्तीच्या आखाड्यातलेही पहिलवान आहेत. खासदार क्रीडा महोत्सवाअंतर्गत येथे विदर्भ केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी सराव करीत असलेल्या पहिलवानांना खासदार तडस यांनी आपल्या दांडग्या अनुभवातून कुस्तीच्या डावपेचांचे धडे दिले.
भाजपचे (BJP) खासदार तडस (Ramdas Tadas) यांचे वय ६८ वर्षे आहे. या वयातही ते नित्यनेमाने व्यायाम करतात. आजही जिल्ह्यात ते पहिलवान (Wrestler) म्हणूच ओळखले जातात. काल त्यांनी नवकुस्तीगीरांना डावपेचांचे धडे देताना स्वतःही एक डाव टाकला. राजकीय आखाड्यात जिल्ह्याचा दिल्लीत झेंडा रोवणाऱ्या खासदार रामदास तडस यांनी बऱ्याच दिवसानंतर आखाड्यात पहिलवानांसोबत डावपेच खेळले. यात त्यांनी नव्या कुस्तीगिरांना ‘ओल्ड इज गोल्ड’ असल्याचे दाखवून दिले. रिंगणात पहिलवानांसोबत केलेल्या डावपेचाने यंदा पुन्हा विदर्भ केसरी वर्ध्याला मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
खासदार क्रीडा महोत्सवात येत्या महिन्यात विदर्भ केसरी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या आयोजनाची पाहणी करण्याकरिता संसदेची चमू आली असता त्यांनी पहिलवानांना अनेक डावपेच शिकविले. देवळीच्या मैदानावर कुस्तीगिरांचा सराव सुरू आहे. यात खासदार रामदास तडस आपल्या अनुभवाचे शिक्षण या नव्या कुस्तीगिरांना देत असल्याचे अनेकवेळा दिसले आहे. त्यांच्याकडून कुस्तीसाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना यश येईल असे अनेकांकडून बोलले जात आहे.
राजकारणाच्या आखाड्यात असलेले खासदार रामदास तडस रोज पहाटे साडेचार ते साडेपाच पहाटे नित्य व्यायाम करतात. व्यायाम झाल्यावर ते येथे सराव करीत असलेल्या नव्या कुस्तीगिरांना ते प्रशिक्षण देतात. यात एखादा कुस्तीगीर तयार होईल अशी अपेक्षा करण्यात येत आहे.
चार वेळा विदर्भ केसरी..
जिल्ह्यात पहिलवान अशी ओळख असलेल्या खासदार रामदास तडस यांनी अनेकांना कुस्तीत चीत केले आहे. विरोधकाला चीत करण्याची सवय यातूनच त्यांच्या अंगी असल्याने त्यांनी राजकीय आखाड्यात यातूनच अनेकांना पछाडले आहे. राजकारणात येण्यापूर्वी पूर्ण वेळ कुस्तीत असताना त्यांनी १९७४, १९७६, १९७८ आणि १९८० या चार वर्षांत त्यांनी विदर्भ केसरीचा मान मिळविला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.