

दत्तात्रय खंडागळे
Sangola News: राज्यात दिनांक 5 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत पुन्हा एकदा वाद निर्माण झाला असून, किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांनी राज्य निवडणूक आयोगाकडे एक महत्त्वपूर्ण याचिका दाखल केली आहे. धार्मिक कारणांमुळे लाखो मतदार मतदानाच्या हक्कापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याने काही जिल्ह्यांतील निवडणूक तारीख 06 किंवा 08 फेब्रुवारी रोजी घेण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
कर्नाटक राज्यातील बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यात असलेल्या चिंचली येथील श्री मायाक्का देवीची यात्रा ही सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा आदी जिल्ह्यांतील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. दरवर्षी या यात्रेसाठी भाविक बैलगाडी, चारचाकी, बस, दुचाकी तसेच पायी मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. मुख्य नैवेद्याच्या आदल्या दिवशी भाविक चिंचली परिसरात मुक्कामी जातात व सकाळी नदीस्नान करून देवीला नैवेद्य अर्पण करतात.
महानैवेद्य (बोनी) व पालखी गुरुवार दिनाकं ५ फेब्रुवारी २०२६ रोजी असल्याने लाखो भाविकांना त्या दिवशी चिंचली येथे उपस्थित राहणे अपरिहार्य आहे. मात्र याच दिवशी महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जाहीर करण्यात आल्याने भाविकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
तर दुसरीकडे भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनीही जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक अत्यंत महत्त्वाचा विषय निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिला आहे. त्यांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा मतदान दिनांक 5 फेब्रुवारी जाहीर केला आहे. मात्र, याच दिवशी महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्र प्रदेशातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या कुलस्वामिनी श्री मायाक्का देवीच्या वार्षिक यात्रेचा मुख्य दिवस असल्याचं म्हटलं आहे.
या यात्रेमध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर या चारही जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात हजारो बैलगाड्या व लाखो भाविकभक्त सहभागी होत असल्याने, मतदानाच्या दिवशीच यात्रा असल्यास मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या घटण्याची गंभीर शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन, सदर विषय निवडणूक आयोगाचे आयुक्त व सचिव यांच्या निदर्शनास आणून देत अधिकृत निवेदन सादर केल्याचं पडळकर यांनी म्हटलं आहे.
या संदर्भात प्रफुल्ल कदम यांनी सांगितले की, श्री मायाक्का देवीची यात्रा ही अनेक दशकांपासून चालत आलेली परंपरा असून, त्याच दिवशी निवडणूक घेतल्यास सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांतील मतदानाचा टक्का लक्षणीयरीत्या कमी होईल. हा लाखो भाविकांच्या धार्मिक श्रद्धेवर थेट हस्तक्षेप असून लोकशाही मूल्यांनाही बाधा आणणारा प्रकार आहे,असंही ते म्हणाले.
निवडणूक तारीख जाहीर करताना संबंधित जिल्ह्यांचा सामाजिक व धार्मिक आढावा घेणे अपेक्षित होते. मात्र श्री मायाक्का देवीच्या यात्रेचा विचार न झाल्याने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, राज्यातील संबंधित जिल्ह्यांचा तातडीने आढावा घेऊन 05 फेब्रुवारीऐवजी 06 किंवा 08 फेब्रुवारी रोजी निवडणूक घेण्यात यावी, अन्यथा उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा स्पष्ट इशारा प्रफुल्ल कदम यांनी दिला आहे.
आमदार गोपीचंद पडळकर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर म्हणाले, यासंदर्भात मुंबई येथे निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांची प्रत्यक्ष भेट घेण्यात आली असून, राज्याचे मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी दूरध्वनीद्वारे सविस्तर चर्चा झाली आहे.
या विषयावर लोकशाहीचा मूलभूत हक्क अबाधित राहील व मतदारांचा व्यापक सहभाग सुनिश्चित होईल, यासाठी सकारात्मक व योग्य तो मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याअनुषंगाने सोलापूर, सांगली, सातारा व कोल्हापूर या चारही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी यांच्याकडून तात्काळ अहवाल मागविण्यात येणार आहे. या सर्व प्रक्रियेनंतर लोकशाहीचा सहभाग अबाधित ठेवणारा सकारात्मक निर्णय घेतला जाईल, असा विश्वासही पडळकर यांनी व्यक्त केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.