

Village election boycott news : विधानसभा, लोकसभा निवडणुकीत अनेकदा नेते-पदाधिकाऱ्यांमधील हेवेदावे समोर येतात. काहीवेळा उमेदवारांचा अर्ज बाद होतो. त्यातून वाद होतात. पण त्यावरून कधी निवडणूक प्रक्रियात रद्द केली जात नाही. मात्र, गावपातळीवरील राजकारण त्यापेक्षा वेगळे असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
राजस्थानातील अलवर जिल्ह्यातील सावडी ग्रामपंचायतीची निवडणूक प्रक्रिया रद्द करण्याची वेळ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आली आहे. सरपंचपदाचे उमेदवार जितेंद्र उर्फ जीत नट यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, छाननीमध्ये काही त्रुटी आढळून आल्याने त्यांचा अर्ज अवैध ठरला. त्यांना अर्जात दुरूस्ती करण्याची संधी देण्यात येऊनही त्याची पुर्तता न झाल्याने अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेतला होता.
जितेंद्र नट यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याचे समोर येतातच अख्खं गाव त्यांच्या पाठीशी उभे राहिले. एवढेच नाही तर या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेले महेंद्र जाटव, मिथलेश देवी, विजय जाटव आणि ललिता देवी या चार उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. त्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात एकही उमेदवार उरला नाही. त्याचप्रमाणे सदस्यपदाच्या निवडणुकीतही सर्व उमेदवारांनी माघार घेतली.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सदस्य आणि सरपंच पदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच निर्माण झाला होता. अखेर एकही अर्ज न आल्याने संपूर्ण निवडणूक प्रक्रियाच रद्द करण्याची वेळ प्रशासनावर आली. अधिकाऱ्यांनी गावकऱ्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्नही निष्फळ ठरला.
जिल्हा निवडणूक अधिकारी आर्तिका शुक्ला यांनी याबाबत सांगितले की, उमेदवार जितेंद्र नट यांच्या अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्यानंतर त्यांना दुरुस्तीची संधी दिली गेली. पण नियमांचे पालन न झाल्याने त्यांचा अर्ज बाद करण्यात आला. त्यांचा अर्ज अवैध ठरल्यानंतर इतर उमेदवारांनी प्रशासनावर दबाव टाकण्यासाठी त्यांचेही अर्ज मागे घेतले.
निवडणूक प्रक्रियाक नियमानुसारच पार पाडली जाईल. या संपूर्ण प्रकरणाचा अहवाल राज्य सरकार आणि निवडणूक आयोगाला पाठविला असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. आधीच्या वेळापत्रकानुसार निवडणूक प्रक्रिया पूर्ण न झाल्याने आता सावडी गावासाठी नव्याने ही प्रक्रिया राबवावी लागणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.