

Mumbai, 17 March : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा दिल्ली दौरा चर्चेत आला आहे. कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सोमवारी (ता. 16 मार्च) दिल्लीला गेले आहेत, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली. शिंदे यांच्या अचानक ठरलेल्या दिल्ली दौऱ्याची चर्चा सुरू असतानाच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याबाबतचे सूतोवाच मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सहकाऱ्याने विधान परिषदेत बोलताना केले.
राज्यात सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. नागरिकांच्या दृष्टीकोनातून महत्वाचे असलेले अधिवेशन सोडून उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सोमवारी दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. त्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली आहे.
शिंदे हे दिल्ली दौऱ्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेणार आहेत. संसदेत गेलेले एकनाथ शिंदे यांनी केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजूजी यांनाही भेटले आहेत. शिंदे यांच्या दिल्लीत भाजप (BJP) नेत्यांशी गाठीभेटी सुरू आहेत. मात्र, ते दिल्लीत नेमके कशासाठी गेले आहेत, अशी चर्चा सुरू झाली आहे.
शिवसेना नाव आणि चिन्हाबाबतच्या सुनावणीबाबत मागच्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांनी सूतोवाच केले होते. त्यावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शिंदेंच्या या दौऱ्यामागे सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी तर नाही ना, अशी चर्चा सुरू आहे, त्यामुळे शिंदेंच्या दिल्ली दौऱ्याची राज्यात खमंग चर्चा सुरू आहे.
एकीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दिल्लीच्या दौऱ्यावर असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही दिल्लीच्या दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे. त्याबाबतचे सूतोवाच राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केले आहे.
मुख्यमंत्री फडणवीस हे कदाचित आज संध्याकाळी किंवा उद्या दिल्लीत जात आहेत, असे भुजबळ यांनी म्हटले आहे. शिंदेंपाठोपाठ देवेंद्र फडणवीस हेही दिल्ली दौऱ्यावर जाणार असल्याने राज्याच्या राजकारणात चर्चेला उधाण आले आहे.
भाजपच्या केंद्रीय संचलन समितीसमोर उमेदवारी निश्चिती केली जाते. फडणवीस हे भाजपच्या केंद्रीय संचलन समितीवर असून बुधवारी होणाऱ्या समितीच्या बैठकीला फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. पाच राज्यांत निवडणुका जाहीर झाल्यानंतर तिकिट वाटपासंदर्भात भाजपच्या केंद्रीय स्तरावर खलबतं सुरू आहेत. त्या बैठकीला फडणवीस हे उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.