

Mumbai : राष्ट्रवादीत बंडखोरी करत अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा तर दिलाच शिवाय थेट काही आमदारांनासह थेट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये देखील सामील झाले. याचवेळी अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर त्यांच्यासोबतच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र, रविवारी(दि.१६) अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. याचवेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीवर आपली प्रतिकिया दिली आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार आणि अजित पवार बैठकीवर भाष्य केलं. फडणवीस म्हणाले, मला या भेटीची कल्पना नाही, पण त्यात काही वावगं आहे असं मला वाटत नाही. शरद पवार हे त्यांचे वर्षानुवर्षे नेते राहिलेले आहेत. त्यामुळे या भेटीत मला काही वावगं आहे असं वाटत नाही असंही स्पष्टीकरण देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिलं.
उपमुख्यमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यासह त्यांच्या मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या आमदारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांची मुंबईतील वाय बी सेंटरमध्ये भेट घेतली. शपथविधीला दोन आठवडे आणि खातेवाटप होऊन काही तासांतच होत ही भेट झाल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. मात्र. या भेटीनंतर अजित पवार यांच्या गटाकडून कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व शरद पवार यांच्या गटाकडून जयंत पाटलांनी भेटीमागचं कारणं स्पष्ट करण्यात आलं आहे. पण तरीदेखील राष्ट्रवादीतील या भेटीमागच्या तर्क-वितर्कांच्या चर्चा अद्याप थांबलेल्या नाहीत.
शरद पवार यांचं मौन...
अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारां(Sharad Pawar)च्या भेटीमागची भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी पटेल म्हणाले, आम्ही आमचे आदरणीय नेते शरद पवार यांची भेट घेतली. त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी अजित पवार यांच्यासह सर्व मंत्री आणि इतर आमदार यशवंतराव चव्हाण सेंटरला आले होते. शरद पवार हे इथे आल्याचे समजल्यावर आम्ही याठिकाणी आलो. त्यांची भेट घेतली.
आमच्या सर्वांच्या मनामध्ये त्यांच्यासाठी आदर आहे. पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकसंध राहू शकतो, यासाठी त्यांनी योग्य विचार करावा आणि मार्गदर्शन करावं अशी विनंती आम्ही त्यांना केली आहे. मात्र, त्यांनी यावर कुठलीही प्रतिक्रिया दिली नाही असे प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले.
'या' नेत्यांनी उपस्थिती...
उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, धनंजय मुंडे, अनिल पाटील धर्मराव बाबा पाटील, संजय बनसोडे, नरहरी झिरवळ यांच्यासह राष्ट्रवादीचे सर्व मंत्री यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये गेले होते.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.