

New Delhi News :विधानसभा निवडणुकीत प्रचंड बहुमतासह महाराष्ट्राची सत्ता काबीज केल्यापासून ते आजपर्यतं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महायुतीत नाराज असल्याच्या चर्चा नेहमीच कानावर येत असतात. ते नाराज नसल्याचं वारंवार सांगतात खरं,पण त्यांच्या काही कृती, काही निर्णय मात्र शंका उपस्थित करतात. अशातच फोडाफोडीचं राजकारणामुळे महायुतीत वादाचा भडका उडाला आहे.
याचदरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) थेट दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अन् भाजपचे वरिष्ठ नेते अमित शाह यांची भेट घेत भाजपच्या वाढच्या फोडाफोडीच्या राजकारणावरुन शाहांकडे तक्रार केल्याचंही बोललं जात आहे. पण या भेटीनंतर आणि बिहारमधील नितीश कुमार सरकारच्या शपथविधीनंतर मुंबईत परतताना शिंदेंची नाराजी अजूनही कायम असल्याचंच दिसून येत आहे.
बिहारचे मुख्यमंत्री म्हणून 10 व्यांदा शपथ घेतलेल्या नितीश कुमार आणि त्यांच्या सरकारच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह,उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ,केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अन् अजित पवार हेही उपस्थित होते. या सोहळ्यानंतर मात्र,घडलेल्या एका प्रसंगानं महायुतीत अजूनही सारंकाही आलबेल नसल्याचीच चर्चा जोर धरू लागली आहे.
बिहारमधील शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे एकाच विमानानं मुंबईत परतले. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच मुंबईत दाखल झाले. यामुळे शिंदेंची महायुती त्यातही भाजपवरची नाराजी कायम असल्याचं बोललं जात आहे.
एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ला म्हणून ठाण्यासह कल्याण-डोंबिवलीमधील प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी ऑपरेशन लोटस सुरू केल्यामुळे शिवसेना चांगलीच संतापल्याचं दिसून आलं. कॅबिनेटच्या बैठकीवर शिवसेनेच्या मंत्र्यांनी बहिष्कार टाकला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री जाऊन भेटले.
यानंतर हा वाद मिटल्याची चर्चा असतानाच शिंदेंनी बिहारच्या शपथविधीचं कारण देत अचानक दिल्ली गाठली अन् केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली. यानंतर पक्षप्रवेशावरुन महायुतीत सुरू असलेल्या नाराजीवरुनच ही भेट घेतल्याची चर्चा आहे.
उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे महायुतीमधील कुरघोडीच्या घटनांवरुन नाराज आहेत. त्यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांच्याकडे तक्रारींचा पाढा वाचल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली होती. पण या सर्व वृत्तांचं एकनाथ शिंदे यांनी शाहांच्या भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना खंडन केलं. त्यांनी आपण बिहार निवडणुकीत झालेल्या विजयानंतर अमित शाह यांचं अभिनंदन करण्यासाठी आलो होतो, असं सांगितलं. यावेळी एकनाथ शिंदे यांना त्यांच्या महायुतीतील नाराजीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी आपण रडणारे नाहीत तर लढणारे आहोत, असंही ठणकावून सांगितलं होतं.
एकनाथ शिंदेंनी म्हणाले, मी तक्रारीचा पाढा वाचणारा नसून मी रडणारा नाही तर लढणारा आहे. राज्यातील छोटे-मोटे वाद आम्ही राष्ट्रीय पातळीवर आणत नसतो. मी आतमध्ये बसलोय आणि बाहेर तुमच्या बातम्या सूरु आहेत, तुम्ही पतंग उडवता. महायुतीमध्येकुठेही मतभेद होणार नाहीत, याची काळजी प्रत्येक पक्षाने घेतली पाहिजे, हा राज्यातला विषय होता. हा विषय दिल्लीतला नव्हताच, असेही एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यातले भाजपचे मुख्य लिडर आहेत, तर मी शिवसेनेचा मुख्यनेता आहे. आम्ही दोघांनीही आमच्या नेत्यांना महायुतीला गालबोट लागणार नाही, अशा पध्दतीचं काम करण्याच्या सूचना केल्या आहेत. मुख्यमंत्री आणि आम्ही काल बसून चर्चा करत मार्ग काढला आहे. तो स्थानिक पातळीवरील विषय होता, तो कालच संपला आहे. महायुती म्हणून आम्ही आगामी निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. विधानसभेला जसं मोठ यश मिळालं तसं आगामी काळातही मिळेल असंही शिंदे म्हणाले.
पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी महायुतीत फोडाफोडीचं राजकारण नको अशा सूचना दिल्या होत्या. तसेच अमित शाहांसोबतच्या भेटीनंतरही पुन्हा एकदा गुरुवारी (ता. 20) भाजप अन् शिवसेनेकडून फोडाफोडीचं राजकारण सुरूच असल्याचं पाहायला मिळालं. हिंगोलीत आमदार संतोष बांगरांचा भाजपला धक्का असो वा मंत्री गिरीश महाजन यांनी जामनेरमध्ये शिंदेंच्या शिवसेनेला दिलेला झटका यांवरुन सध्यातरी महायुतीत कुरघोडीचं थांबणार नसल्याचेच हे संकेत मिळत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.