Balasaheb Thackeray Jayanti : 'तेव्हा ते हिंदुत्वाच्या नावाखाली चाचपडत होते'; बाळासाहेबांच्या 100 व्या जयंतीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेने भाजपला करून दिली 'ती' आठवण!
Mumbai News, 23 Jan : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त ठाकरेंच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामधून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे. यामध्ये आज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या षण्मुखानंद सभागृहातील मुख्य सोहळ्यात उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येऊन शिवसेनाप्रमुखांना मानवंदना देणार आहेत.
यापेक्षा बाळासाहेबांच्या वाढदिवसाची सुंदर भेट कोणती असू शकेल, असं म्हणत ठाकरे बंधुंच्या एकत्र येण्यावर भाष्य केलं आहे. तसंच यावेळी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना कशासाठी केली? त्यांचं मराठी प्रेम आणि हिंदुत्वाचं धोरण कसं होतं यावर प्रकाश टाकला आहे. शिवाय याचवेळी भाजपच्या हिंदुत्वावर निशाणा देखील सामनातून साधण्यात आला आहे.
सामनाच्या अग्रलेखात लिहिलं की, 'ज्या ‘मराठी’ समाजाचे आपण घटक आहोत त्याच्या मताला आणि अस्तित्वाला किंमत राहिलेली नाही. त्याला सार्वजनिक मत नाही, राजदरबारात किंमत नाही. या महाराष्ट्र भूमीत जन्म घेऊनही ‘मराठी’ म्हणून सतत अवहेलनाच होत आहे. हा अन्याय आहे असे बाळासाहेबांच्या मनाने घेतले.
परिणामी मराठी लोकांत जागृती व ज्वलंत संघटन हेच आपले ध्येय असे त्यांनी ठरवून टाकले. ते ध्येय साध्य करण्यासाठी आपण आमरण झटत राहावयाचे असा निर्धार त्यांनी केला. त्याच निर्धारातून ‘शिवसेना’ या जहाल संघटनेची ठिणगी पडली. पन्नास वर्षांनंतरही या ठिणगीतून पेटलेली मशालीची धग कायम आहे. शिवसेनेचा लढा हा जातीय आणि प्रांतीय नसून तो रोजीरोटीचा, मानसन्मानाचा आणि स्वाभिमानाचा लढा आहे.
खरे म्हणजे या मुंबई शहरात बाळासाहेबांनी शिवसेना जन्मास घातली नसती तर या महाराष्ट्राच्या राजधानीतून मराठी माणसाचे कायमचेच उच्चाटन झाले असते. एकतर मुंबईत मराठी माणसाचा टक्का कमी आणि त्यात भर बेपर्वा राज्यकर्त्यांची. त्यामुळे मुंबईची अवस्था ‘आव जाव घर तुम्हारा’ अशा धर्मशाळेसारखी झाली. गेल्या पन्नास वर्षांत या धर्मशाळेची व्याप्ती वाढली आहे. मुंबईतून अडीच लाख गिरणी कामगार गायब झाला.
त्यामुळे गिरणगावचा इतिहास, भूगोल बदलला. गिरणगावातल्या ‘चिमण्या’ गेल्या व तेथे टोलेजंग टॉवर्स निर्माण झाले. या ‘टॉवर्स’मध्ये मराठी माणसाचे अस्तित्वच उरले नाही. ते सर्व टॉवर्स राक्षस बनून मुंबईचे ‘मराठीपण’ उद्ध्वस्त करायला निघाले आहेत. अशा वेळी आजही बाळासाहेबांची आठवण येते. आज बाळासाहेब हवे होते असे सगळ्यांना वाटते. आज बाळासाहेब नाहीत, पण त्यांनी निर्माण केलेली शिवसेना सदैव मराठी माणसाच्या रक्षणाचेच काम करीत आहे.', असं सामनात म्हटलं आहे.
तर बाळासाहेबांनंतर शिवसेना त्यांचे कार्य पुढे नेत आहे. बाळासाहेब मराठी अभिमानी होते. मराठीला न्याय्य हक्क मिळायलाच हवा हे त्यांचे ठाम मत होते. अर्थात म्हणून त्यांनी इतर भाषिकांचा कधी द्वेष केला नाही. कधी कुणाशी ते सुडाने वागले नाहीत. राजकीय भांडण ‘शत्रू’च्या घरापर्यंत नेले नाही. ते दीर्घद्वेषी नव्हतेच. मुंबई रोजगाराची खाण आहे. ‘‘या, कष्ट करा, कमवा, पण मुंबईवर मालकी हक्क सांगू नका’’ एवढेच त्यांचे म्हणणे असायचे, असंही सामनात म्हटलं आहे.
तर हिंदुहृदयसम्राट म्हणून बाळासाहेब सगळय़ांनाच प्रिय ठरले. आपल्या समाजासाठी, धर्मासाठी लढणारा व विकला न जाणारा नेता अशी त्यांची ख्याती झाली. बाळासाहेब हिंदूंचे नेते झाले तेव्हा आजचा भारतीय जनता पक्ष हिंदुत्वाच्या नावाखाली चाचपडत होता. त्यांना हिंदुत्वाचा सूर सापडत नव्हता. तो सूर बाळासाहेबांमुळे गवसला. आज ज्या धर्मांध हिंदुत्वाचा आधार भाजपने घेतला आहे, तसले हिंदुत्व बाळासाहेबांनी कधीच मान्य केले नाही, असं म्हणत भाजपवर निशाणा साधला.
तसंच सामनात शिवसेनेच्या स्थापनेच्या वेळी बाळासाहेबांवर प्रांतीयवादी असल्याचा शिक्का मारला, तो चुकीचा होता, असंही म्हटलं आहे. कारण भारतीय घटनेनुसार प्रत्येक भाषिकासाठी स्वतंत्र राज्य निर्माण झाले. भाषिक प्रांतरचना त्यानुसार झाली. मग फक्त मराठी माणसालाच स्वतःच्या राज्यासाठी साडेचार वर्षे दिल्लीशी युद्ध का करावे लागले? असा सवाल करत मुंबईसह महाराष्ट्र आम्ही लढून मिळवला.
मराठी माणसाने रक्त सांडले, बलिदाने दिली. त्यामुळे मुंबईसह महाराष्ट्र अखंडच राहायला हवा. ‘‘महाराष्ट्र कुरतडण्याचा कोणी प्रयत्न केला तर शिवसेना त्यांच्या नरडीचा घोट घेतल्याशिवाय राहणार नाही,’’ अशी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची सिंहगर्जनाच होती. ही सिंहगर्जना आजही घुमत आहे. या सिंहगर्जनेमुळेच महाराष्ट्र सुरक्षित आहे. याच सिंहगर्जनेने मुंबईवर मराठी ठसा कायम राहिला. सिंहगर्जनेला शंभर वर्षे झाली तरी ती जमिनीवर, आसमंतात घुमतच आहे, अशा शब्दात सामानतून बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.
