

Congress candidate Baramati : विमान अपघातात अजित पवार यांचे निधन झाल्यामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या महायुतीच्या उमेदवार असतील. त्यांच्याविरोधात उमेदवार देणार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यापूर्वीच जाहीर केले आहे. मात्र, काँग्रेसला त्यांची ही भूमिका मान्य नसल्याचे समोर आले आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यासह ज्येष्ठ नेते आमदार विजय वडेट्टीवार यांनी बारामती उमेदवार देण्याचे संकेत दिले आहेत. वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या विधानाचा संदर्भ देत सांगितले की, सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांच्याविरोधात उमेदवार देणार नसल्याचे म्हटले आहे. महाविकास आघाडी म्हणून त्यांची ही भूमिका मान्य नाही.
सोमवारी याबाबत बैठक होणार आहे. तिथे आम्ही बोलू. परंतू जर तिथे राष्ट्रवादी पक्ष (शरदचंद्र पवार पक्ष) उमेदवार उतरविणार नसेल तर काँग्रेसला उमेदवार देण्याबाबत विचार करावा लागेल. त्याची चर्चा आम्ही करू, असे वड्डेटीवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यावरून हर्षवर्धन सपकाळ यांनीही सूचक विधान केले होते.
सपकाळ यांनी महाराष्ट्रात बिनविरोध निवडणुकांची परंपरा नसल्याचे म्हटले आहे. त्यांनी सांगितले की, एकाद्याचे निधन झाल्यानंतर त्याठिकाणी काही अपवाद वगळता बिनविरोध निवडणुकांची परंपरा नाही. तशा निवडणुका झाल्या आहेत. त्यामुळे इथे (बारामती व राहुरी) निवडणुका झाल्यास त्यात काही वावगे नाही, असे सपकाळ यांनी म्हटले आहे.
दरम्यान, बारामती व राहुरी विधानसभा मतदारसंघाची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी सकारात्मक भूमिका घेतली होती. बारामतीसाठी सुप्रिया सुळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, काँग्रेसकडून उमेदवार देण्याबाबत विचार सुरू असल्याने या निवडणुकीत मोठा ट्विस्ट आला आहे. अद्याप उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी बराच कालावधी असला तरी काँग्रेसच्या भूमिकेने निवडणूक बिनविरोध होणार की नाही, याबाबतचा संभ्रम आणखी वाढला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.