

भाजपचा स्टार प्रचारकांचा मोठा ताफा जाहीर — मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, 4 केंद्रीय मंत्री, 14 मंत्री, 3 खासदार आणि अनेक दिग्गज नेते स्थानिक स्वराज्य निवडणुकीत प्रचारासाठी उतरवले जात आहेत.
स्वबळावर लढण्याची रणनीती — बिहार निकालानंतर वाढलेल्या आत्मविश्वासामुळे अनेक नगरपालिकांमध्ये भाजप मित्रपक्षांपासून स्वतंत्रपणे, म्हणजेच एकट्याने निवडणूक लढविणार आहे.
तावडे–शिवप्रकाश हे महत्त्वाचे संघटक — बिहार विजयानंतर तावडे आणि संघ पार्श्वभूमी असलेले शिवप्रकाश यांना महाराष्ट्रात आणण्यात आले आहे.
Mumbai, 14 November : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या स्टार प्रचाराची यादी जाहीर झाली असून त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष, चार केंद्रीय मंत्री, राज्यातील चौदा मंत्री, तीन खासदार अशी तगडी फौज भाजपने मैदानात उतरवली आहे. यात बिहार जिंकून देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावणारे राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, नारायण राणे, अशोक चव्हाण, रावसाहेब दानवे, गोपीचंद पडळकर, सुधीर मुनगंटीवार यांचा समावेश आहे.
राज्यातील बहुतांश नगरपालिकांची (NagarPalika) निवडणूक भारतीय जनता पक्षाने स्वबळावर लढविण्याचा निर्णय घेतला आहे. आज जाहीर झालेल्या बिहारच्या निकालाने भाजपचा आत्मविश्वास दुणावला आहे. अनेक ठिकाणी भाजपने मित्रपक्षाचे बंधन झुगारून स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याला आता मंत्री आणि संघटनेतील नेत्यांच्या ताकदीची जोड देण्यात आली आहे.
राज्यातील २४२ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी भाजपने (BJP) आपल्या मुलुखमैदानी तोफांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये कट्टर हिंदुत्वाची भूमिका निभावणारे नीतेश राणे आणि गोपीचंद पडळकर या वादग्रस्त नेत्यांचा त्यात समावेश आहे. माजी खासदार अमर साबळे यांच्या खांद्यावरही पुन्हा प्रचाराची धुरा साेपविण्यात आले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पियूष गोयल, रक्षा खडसे, मुरलीधर मोहोळ या चार केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. तसेच, राज्यातील चंद्रशेखर बावनकुळे, राधाकृष्ण विखे पाटील, गणेश नाईक, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, ॲड. आशिष शेलार, जयकुमार रावल, शिवेंद्रसिंहराजे भोसले, नीतेश राणे, अतुल सावे, अशोक उईके हे कॅबिनेट तर मेघना बोर्डीकर या राज्यमंत्र्यांना भाजपने प्रचारासाठी राज्यभर फिरविण्याचा निर्णय घेतला आहे.
नारायण राणे, अशोक चव्हाण, धनंजय महाडिक या तीन खासदारांचा त्यात समावेश आहे. तसेच, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, चित्रा वाघ, प्रवीण दरेकर, डॉ. भागवत कराड, अमर साबळे, डॉ. संजय कुटे, अमीत साटम, माधवी नाईक, रणधीर सावरकर, अशोक नेते, मंगेश चव्हाण, प्रसाद लाड, इद्रिस मुलतानी यांचाही त्यात समावेश आहे.
महाराष्ट्राच्या प्रचारात उतरलेले शिवप्रकाश कोण?
राष्ट्रीय सचिव विनोद तावडे, राष्ट्रीय सहसंघटन मंत्री शिवप्रकाश हेही महाराष्ट्राच्या प्रचारात उतरले आहेत. तावडे यांनी बिहार विधानसभेची निवडणूक जिंकून देण्यात महत्वपूर्ण भूमिका निभावलेली आहे. तसेच, यापूर्वी रा. स्व. संघाचे क्षेत्रीय प्रचारक राहिलेले शिवप्रकाश यांची महाराष्ट्रासह उत्तराखंड, उत्तर प्रदेशच्या निवडणुकांत भाजपला विजय मिळवून देण्यात संघटनात्मक आणि बूथस्तरीय व्यवस्थापनाची मोठी भूमिका राहिलेली आहे.
भाजपने इतका मोठा प्रचारकांचा ताफा का उतरवला?
नगरपालिका निवडणुकांमध्ये स्वबळावर जिंकण्यासाठी आणि सर्वत्र संघटन मजबुतीसाठी.
यादीत कोणते प्रमुख केंद्रीय मंत्री आहेत?
नितीन गडकरी, पियूष गोयल, नारायण राणे, अशोक चव्हाण.
नीतेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांचा समावेश का महत्वाचा?
ते कट्टर हिंदुत्ववादी आणि प्रखर प्रचारक मानले जातात; त्यांची उपस्थिती प्रभावी समजली जाते.
शिवप्रकाश कोण आहेत आणि त्यांची भूमिका काय?
ते राष्ट्रीय सहसंघटन मंत्री असून उत्तर प्रदेश–उत्तराखंडमध्ये भाजपला विजय मिळवून देणाऱ्या बूथस्तरीय व्यवस्थापनात पारंगत आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.