

Jyoti Waghmare: राज्यसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ७ जागांपैकी केवळ एकाच जागेवरुन अर्ज भरण्याच्या शेवटच्या वेळेपर्यंत सस्पेन्स कायम होता. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून शेवटच्या क्षणी उमेदवारी जाहीर करण्यात आली. तत्पूर्वी ज्या नावाची चर्चा होती त्यांच ज्योती वाघमारे यांना शिवसेनेकडून अधिकृतरित्या राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. पक्षातील अनेक दिग्गजांना डावलून नवख्या व्यक्तीला उमेदवारी दिल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. पण नव्या चेहऱ्याला संधी दिल्यानं अनेकांनी या निर्णयाचं स्वागतही केलं आहे. यानंतर खुद्द ज्योती वाघमारे यांना आपली लोकसभेच्या वरिष्ठ सभागृहात बिनविरोध निवड झाल्याबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
ज्योती वाघमारे म्हणाल्या, "वाटलं नव्हतं कधी हा दिवस येईल, कारण लहानपणापासून भाकरीचा संघर्ष बघितला, लहानपणापासून भुकेचे चटके सोसलेत, संघर्ष केला आहे. त्यामुळं दसरा मेळाव्यात बोलण्याची संधी मिळाली ना, मग म्हटलं बस्स आता यापेक्षा काहीही असू शकत नाही. आपल्यासारख्या एक वंचित-दलित समाजातील भीमराजच्या बेटीला दसरा मेळाव्यात शिवसेनेचा आवाज बनून बोलायला संधी दिली तिथंच मी खूष होते. शिवसेना हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. बाळासाहेब ठाकरे म्हणायचे की, शिवसैनिक हीच तुमची जात आणि तोच तुमचा धर्म. त्यामुळं आज कुठल्याही प्रकारचं आरक्षण नसताना माझ्यासारख्या एका दलिताच्या मुलीला, जिचा बाप एक सर्वसाधारण कामगार आहे, जिच्या आईनं काबाडकष्ट केलेले आहेत. त्यांना आज देशाच्या वरिष्ठ सभागृहात सोलापूरच्या गल्लीत अनवाणी पायानं चालणारी पोरगी आज दिल्लीपर्यंत पोहोचते आहे त्यामुळं एकनाथ शिंदेंच आभार. तसंच ज्यांनी लढण्यासाठी बळ दिलं त्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, माता भीमाई, माता सावित्रीमाई, माँ जिजाऊ या सर्वांचे आभार.
ही उमेदवारी माझी उमेदवारी नाही तर जिजाऊंच्या हातातील तलवारीची आहे, सावित्रीमाईंच्या हातातल्या पाटीची आहे, ही उमेदवारी बाबासाहेबांच्या हातातील पेनाची आहे, ही उमेदवारी लाडक्या बहिणींची आहे, ही उमेदवारी कष्ट करणाऱ्या प्रत्येकाची आहे, ही उमेदवारी त्या प्रत्येक लाडक्या बहिणीची आहे, जी झगडते आहे संघर्ष करते आहे. कंबरेला पदर कसून ती झगडते आहे, त्या प्रत्येक लाडक्या बहिणीला आज एकनाथ शिंदेनी याद्वारे विश्वास दिला आहे.
"उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी ज्या घडामोडी घडत होत्या त्यावर बोलताना ज्योती वाघमारे म्हणाल्या, "मला या संदर्भातील माहिती नाही. खूप साधी मुलगी आहे मी मला नाही कळत राजकारण! पण मला विश्वास आहे की माझे नेते एकनाथ शिंदे यांनी मला जी संधी दिली आहे त्याचं मी सोनं करेल. जे जे लोक या जागेसाठी इच्छुक होते, हे सर्वजण ज्येष्ठ आहेत. त्यांचं योगदानही पक्षासाठी तेवढंच महत्वाचं आहे. आमच्या मुख्य नेत्यांसोबत ते थांबतील. कुठलाही वारसा नसलेली, कुठल्याही घराण्याची परंपरा नसलेली अन् जिनं संघर्षातून स्वतःच शिक्षण पूर्ण केलं जी आजही धडपडत आहे, याचा आमच्या सर्व लाडक्या भाऊ-बहीनींनाही याचा आनंद वाटेल," असंही ज्योती वाघमारे यांनी म्हटलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.