Chhagan Bhujbal : अजितदादांवर बोलताना भुजबळांचा कंठ दाटून आला...शब्दही फुटेना; म्हणाले ‘आमचा आधारवड...’

Ajit Pawar Death : अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजित पवार यांच्या शोकप्रस्तावावर छगन भुजबळ भावनिक झाले. दादांच्या आठवणींना उजाळा देताना त्यांचा कंट दाटून आला. शोकप्रस्तावाला पाठिंबा देत त्यांनी भाषण संपवले.
Chhagan Bhujbal-Ajit Pawar
Chhagan Bhujbal-Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 23 February : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूचा शोकप्रस्ताव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत मांडला. त्यावर बोलताना अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अजितदादांच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच, दादा आमच्यासाठी मोठे आधारवड होते. मात्र त्या आधारवडला आम्ही आज मुकलो आहोत, असे सांगताना भुजबळांचा कंट दाटून आला. त्यांना ‘श्रद्धांजली’ हा शब्दही त्यांना फुटेना. शेवटी मुख्यमंत्र्यांनी जो शोकप्रस्ताव मांडला त्याला पाठिंबा देतो, असे सांगून त्यांनी आपले भाषण संपवले.

मंत्री भुजबळ म्हणाले, अजितदादांवरील शोकप्रस्तावर बोलायची वेळ येईल, असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं. अजितदादांचा इथेच कुठेतरी वावर आहे, असं अजूनही वाटतंय. कुठेतरी ऑफीसमध्ये बसले असतील, चर्चा सुरू असेल, कुठेतरी काम करत असतील, असे वाटतं. दुर्दैव अजितदादांना अशा अर्थाने लागू होतं की, लहानपणीच त्यांचं वडिलांचं छत्र हरपलं.

शरद पवार यांच्या देखरेखीखाली अजितदादा तयार झाले. दादांच्या अपघाताची बातमी मला समीरने येऊन सांगितली. आम्ही त्यांना भेटायला जाण्याच्या तयारीत असतानाच समीरने पुन्हा ‘दादा आपल्यात नाहीत,’ असा निरोप दिला. त्यावर अजूनही विश्वास बसत नाही. एवढा मोठा धक्का क्वचितच बसलेला असेल, अशी कबुलीही भुजबळांनी दिली.

ते म्हणाले, २७ तारखेला कॅबिनेटमध्ये, मुख्यमंत्र्यांच्या केबिनमध्ये दादा चर्चेला होते आणि अवघ्या १२ ते १५ तासांमध्ये ते नाहीत, हे ऐकायला मिळतं. बारामतीत पोचल्यानंतर मी ॲक्सिडेंट स्पॉटवर गेलो होतो. पाहिलं तर धस्स झालं. दादांचा तो फोटो तर अजूनही डोळ्यासमोरून जात नाही. जाण्याची प्रत्येकाची एक वेळ आहेच, पण दादा अशा पद्धतीने जावेत, हे दुःखदायक आहे.

Chhagan Bhujbal-Ajit Pawar
Satara ZP : साताऱ्यात शंभुराज देसाईंच विमान जमिनीवर : महायुती फिक्स करत जयकुमार गोरेंनी अध्यक्षपद भाजपकडे खेचून आणलंच!

अजितदादांची आणि माझी ओळख ही शरद पवार हे जेव्हा संरक्षण मंत्रिपदावरून राज्यात मुख्यमंत्री म्हणून परत आले, तेव्हा त्यांच्या मंत्रिमंडळात माझ्याकडे गृहनिर्माण मंत्रिपद होतं. तेव्हा अशोक चव्हाण आणि अजितदादांना पवारांनी आपल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री म्हणून घेतले होतं. तेव्हापासून माझी आणि त्यांची ओळख होती, असेही भुजबळांनी नमूद केले.

ते म्हणाले, पवारांच्या रचनात्मक कामाची पद्धत अजितदादांनी अंगीकारली होती. विरोधी पक्षांसोबत त्यांचे मैत्रीचे संबंध होते. आम्ही तर स्वप्नच पाहत होतो की, अजितदादा एक ना एक दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतील. राजकारणात काहीही घडू शकतं. त्यामुळे दादा मुख्यमंत्री होतील, अशी आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या मनात भावना होती. पण अचानक दादा डाव मोडून गेले. सगळं सोडून गेलं.

Chhagan Bhujbal-Ajit Pawar
Fadnavis On Ajitdada : विमान अपघाताच्या आदल्या दिवशी कॅबिनेटमध्ये काय घडलं होतं? तो पाऊण तास काय चर्चा झाली; फडणवीसांनी सांगितली आठवण

नीटनेटकेपणा, वक्तशीरपणा याबाबतचे दोन ते तीन लोक पाहिले. त्यात बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यातील गुणांचा मिलाफ हे अजितदादा होते. चूक कबूल करण्याचा मोठेपणाही दादांमध्ये होता. एक आधारवड असतो, त्याखाली अनेक लोक आश्रयाला येत असतात. तो आधारवड किती माेठा आहे, ते आपल्याला कळतसुद्धा नाही. पण जेव्हा तो आधारवड उन्मळून पडतो, तेव्हा लक्षात येतं की त्याच्या फांद्या किती मोठ्या आहेत, हा आधारवड किती मोठा होता. दादांच्या बाबतीत अशीच भावना आमच्या सर्वांच्या मनात आहे. दादांच्या रूपाने फार मोठा आधारवड आमच्यामध्ये होता, पण आज आम्ही त्यांना मुकलो आहोत, असे सांगताना भुजबळांचा कंट दाटून आला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com