Mumbai : राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या सत्तेतील सहभागामुळे राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहे. पण अजित पवार हे लवकरच भाजपसोबत जातील असा दावा करुन सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात पहिला बॉम्ब टाकला होता. राष्ट्रवादी फुटण्याच्या दोन महिने अगोदरच त्यांनी 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार असं ट्विट करुन हा दावा केला होता.
जुलै महिन्यात अजित पवार हे काही प्रमुख नेते आणि आमदारांसह भाजप प्रणित महायुती सरकारमध्ये सहभागी झाले. आता पुन्हा एकदा अंजली दमानिया चर्चेत आल्या आहेत. त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भेट भाजप मंत्र्यांच्या बंगल्यावर भेट घेतली आहे.
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांची भेट झाल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे ही भेट भाजपचे मंत्री अतुल सावे यांच्या बंगल्याबाहेर झाली. यावेळी पवार आणि दमानिया यांच्यात 10 मिनिटे चर्चा झाली.
''...तर आमचीही वाजवा !''
राष्ट्रवादीतील फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार गटाकडून एकमेकांवर आरोप- प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झाडल्या जात आहेत. या फैरींनी एकीकडे राजकीय वातावरण तापले असतानाच आता आमदार रोहित पवार यांनी अंजली दमानिया यांची भेट झाली आहे. या भेटीनंतर तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
या भेटीनंतर दमानिया पुन्हा अॅक्शन मोडमध्ये येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच राजकीय वर्तुळात आरोपांचा बॉम्ब कुणावर टाकणार, राष्ट्रवादीच्याच नेत्याचा करेक्ट कार्यक्रम होणार ? अशा चर्चांना उधाण आले आहे. कारण रोहित पवार(Rohit Pawar) यांनी आम्ही चुकलो तर आमचीही वाजवा अशी मिश्किल टिप्पणीही पवार यांनी दमानिया यांच्यासमोरच केली आहे.
'' होय, मी बालिश,लहान आहे, पण...''
अजित पवार (Ajit Pawar) गटाचे नेते व खासदार सुनिल तटकरेंवर निशाणा साधताना रोहित पवार म्हणाले, होय, मी बालिश आहे, लहान आहे, पण आम्ही विचारांनी मोठे आहोत असे ते म्हणाले. तसेच मी माझी भूमिका बदललेली नाही असंही पवार म्हणाले.
यावेळी त्यांनी पुणे,नगरमध्ये हलाखीची परिस्थिती आहे. इतर तालुक्यातही समस्या आहेत. दादांनी याकडे लक्ष द्यायला हवं. कुठेही बैठक घ्या, कुणाच्याही घरी घ्या पण निर्णय घ्या. मोदींच येणार हा भाजपचा अहंकार आहे. मात्र, 2024 ला परिवर्तन अटळ आहे. भाजपला अहंकाराची किंमत मोजावी लागणार असेही आमदार रोहित पवार म्हणाले.
अंजली दमानिया(Anjali Damania) यांनी अजित पवारांवर घोटाळ्याचे गंभीर आरोप केले होते. तसेच एप्रिल महिन्यात त्यांनी खळबळजनक ट्विट केला होता. या ट्विटमध्ये दमानिया यांनी, आज मंत्रालयात कामानिमित्त गेले होते. तिथे एका व्यक्तीने मला थांबवले आणि एक गमतीशीर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, 15 आमदार बाद होणार आहेत आणि अजित पवार भाजप बरोबर जाणार आहेत. तेही लवकरच. बघू आणि किती दुर्दशा होतेय महाराष्ट्राच्या राजकारणाची असं म्हटलं होतं.
यानंतर अजित पवार जुलै महिन्यात भाजप प्रणित युतीसरकारसोबत सत्तेत गेले. यानंतर राष्ट्रवादीच्या नऊ मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथही घेतली आहे. त्यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी सध्याचं राज्यातील राजकारण हे अत्यंत गलिच्छ असल्याचा हल्लाबोल दमानिया यांनी केला होता.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.