Mumbai News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या घरी शुक्रवारी देशातील विरोधकांची बैठक झाली. या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे परिवार वाचवा बैठकीसाठी पाटण्याला गेले आहेत, अशी टीका केली. फडणवीसाच्या टीकेला ठाकरेंनी शनिवारी प्रत्युत्तर दिले. ठाकरेंच्या उत्तरावर फडणवीसांनी टि्वट करीत पलटवार केला आहे.
"देवेंद्रजी परिवार तुम्हालाही आहे," असे म्हणत ठाकरेंनी फडणवीसांना थेट इशारा दिला. दादरच्या शिवाजी मंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याला ठाकरे बोलत होते.
"तुमच्याही परिवाराचे व्हॉट्सअप बाहेर आले आहेत. आम्ही त्यावर अजून बोललो नाही. आम्ही त्यावर बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. वेगळी कोणतीही आसनं तुम्हाला झेपणार नाही. फक्त झोपावं लागेल, योगा डे.. त्यामुळे परिवारावर बोलू नका. मी परिवाराबाबत संवेदशनील आहे. सूरज आणि सर्व शिवसैनिक माझं कुटुंब आहे. माझ्या कुटुंबाची मी काळजी घेईल. परिवाराबद्दल बोलू नका. अनेकांच्या अनेक गोष्टी आमच्याकडे आहेत. तुमच्या कुटुंबाची जबाबदारी दुसरं कोणी घेत असेल तर ते तुम्हाला माहीत. मी माझं कुटुंब जपणार. त्यामुळे परिवार बचाव बोलू नका, असा सज्जड दम उद्धव ठाकरेंनी भरला.
ठाकरेंच्या या इशाऱ्याला फडणवीसांनी सडेतोड उत्तर दिले आहे. "मी, माझे कुटुंब आणि माझा संपूर्ण भाजपा परिवार एक खुली किताब आहे उद्धव ठाकरे !" असे सांगत फडणवीसांनी पलटवार केला आहे.
"ज्या ‘व्हॉटसअॅप चॅट’ बाबत तुम्ही बोलताय, ते आरोपपत्राचे भाग आहेत. न्यायालयाच्या रेकॉर्डवर आहेत आणि जाणीवपूर्वक टाकले आहेत, कारण, लपविण्यासारखे आमच्याकडे काहीच नाही. पण, मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या माणसाला इतकी ‘बालबुद्धी’ असावी, याचे मात्र आश्चर्य वाटते. त्यामुळे त्याची फार चिंता तुम्ही करु नका," असे फडणवीसांनी टि्वटमध्ये म्हटलं आहे.
ठाकरेंनी आपल्या भाषणात भाजपच्या हिंदुत्वावर, जे.पी.नड्डा यांच्यावर टीका केली. त्यावर फडणवीस म्हणाले, "तुमचे हिंदूत्त्व आणि तुमचे कारनामे आता एकेक करीत जनतेत उघड होतच आहेत आणि होतच राहणार. आम्ही कुणाच्या घरात घुसत नाही. पण, घुसलोच तर त्यांना तोंड दाखवायला जागा उरणार नाही. तुमचे ‘नड्डे’ केव्हा सैल होतील, हे समजणार देखील नाही. (नड्डे म्हणजे घसा) तोवर तुमची हास्यजत्रा चालू द्या...बघूच आता शवासन कुणाला करावे लागते ते…"
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.