
Mumbai, 14 July : शांत, संयमी म्हणून ओळख असलेले भाजपचे आमदार संजय केळकर यांंनी आज (ता. 14 जुलै) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील ठाणे महापालिकेच्या कारभाराचे विधानसभेत अक्षरशः वाभाडे काढले. त्यांनी ठाणे महापलिकेतील अधिकाऱ्यांपासून सुरूवात केली. ठाणे महापालिकेतील अधिकारी उन्मत्त, उर्मट आणि उद्धट आहेत, शब्दांत पिसे काढली. एकाच रस्त्याचे तीन वेळी कंत्राट देऊन 180 कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप केळकर यांनी या वेळी केला.
आमदार केळकर म्हणाले, ठाणे महापालिकेतील (Thane Corporation) अधिकारी उर्मट, उद्धट, उन्मत्त, बेजबाबदार आणि बेछूट आहेत. सरकार, लोकप्रतिनिधी यांचे आदेश किंवा त्या भागातील जनतेच्या तक्रारी केराची टोपली दाखविण्याचे काम उर्मट, उद्धट अधिकारी करताना दिसतात. ठाणे महापालिकेत अनेक चुरस कथा आहेत. सरकारचा निधी खर्च करण्यासाठी योग्य पद्धतीने योजना आखा, असे सांगितले जाते. मात्र, तेथील अधिकाऱ्यांनीच काहीतरी ठरवले आहे, अशी परिस्थिती आहे.
ठाणे शहरात आठ हजार कोटी रुपयांचा निधी आला. त्यातील तीन हजार कोटी रुपयांचा हिशेबच लागत नाही. ठाण्याचे नागरिक त्याचा हिशेब विचारत आहेत. ते पैसे गेले कुठे. ठाणे महापालिकेचा पाच वर्षांचा ऑडीट रिपोर्टसुद्धा आलेला नाही, लेखा परीक्षणसुद्धा झालेले नाही, हे खेदाने सांगावसे वाटते. पाच वर्षे ठाणे महापालिकेचा लेखापरीक्षण झाले नाही म्हणजे किती प्रकारचे घोटाळे झाले असतील? मागच्या वेळी मी जेव्हा आवाज उठवला, तेव्हा २०१९-२० आणि २०२०-२०२१ या वर्षांचा लेखापरीक्षणाचा अहवाल आला. पण तो अजून वेबसाईटवर आलेला नाही, असा दावाही भाजप आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) यांंनी केला.
ते म्हणाले, तब्बल आठ हजार कोटी रुपयांचा निधी येतो, अनुदान मिळतं. तेव्हा पारदर्शकता आणि निकषांचे उल्लघंन केल्याचे आपल्याला दिसून येते. शासकीय निधीचा गैरव्यवहार झाले आहेत. गुंतवणूक प्रक्रियेत अपारदर्शकता आहे., त्यामुळे आम्ही पत्र देऊन कारवाईची मागणी केलेली आहे. ठाणे महापालिकेने लेखा परीक्षण न करणे म्हणजे कारवाई कारण्यासारखी परिस्थिती आहे.
सन २०२०-२१ मध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक ५८८ कोटी रुपये इतकी होती. लेखा परीक्षण अहवालात ७०. ५४ कोटी गुंतवणूक दाखवलेली आहे. म्हणजे ५१८ कोटींची लेखा नोंद उपलब्ध नाही, त्यामुळेच हे लेखापरीक्षणाचा अहवाल सादर करत नाहीत. सूर्यवंशी नावाचे अधिकारी बदलीचे आदेश येऊनही ते त्याच ठिकाणी बसलेले आहेत, असेही त्यांनी निर्दनशानास आणून दिले.
एका रस्त्याचे तीन तीन वेळा कंत्राट दिले जाते, त्याबाबत माझ्याकडे पुरावा आहे. लेखा परीक्षणात त्यावर तोशरे ओढलेले आहेत. या रस्त्याच्या कंत्राटात १७० कोटी रुपयांचा अपहार केलेला आहे. खोटे प्रस्ताव दाखवून पैसे लुबाडण्याचे काम ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी केले आहे. त्याची चौकशी करणार का, असा सवाल संजय केळकर यांनी केला.
नगरविकास खातं कोणालाही काहीही देतं. कोअरशेतला एअरफोर्सचं स्टेशन आहे. संवदेनशील भाग आहे. ठाण्यात डेव्हल्पमेंट प्लॅनचे काम सुरू आहे, त्याबाबत आमच्याकडे हजारो तक्रारी आलेल्या आहेत. सोयीने बिल्डरधार्जिणा डेव्हल्पमेंट प्लॅन तयार करण्यात आलेला आहे. शासकीय जागेवर टीडीआर देण्यात आलेला आहे, त्या टीडीआरची ५० टक्के विक्रीही करण्यात आलेली आहे. हे कुठल्या आशीर्वादाशिवाय होऊ शकतं का, असा सवालही केळकर यांनी उपस्थित केला.
मधल्या काळात स्थगिती सरकार आलं
महायुती सरकारने एमएमआरडीएमध्ये अनेक विकासकाम केली. देवेंद्र फडणवीस यांनी २०१४ ते २०१९ त्यानंतर मधल्या काळात सत्तेवर आलेल्या स्थगिती सरकारने आमच्या अनेक प्रकल्पांना खीळ बसली. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणुकीनंतर धोका होऊन सरकार आलं आणि त्यांनी अनेक प्रकल्पांना स्थगिती दिली. ठाण्याच्या जैवविविधतेच्या प्रकल्पालाही स्थगिती देण्याचे काम त्या वेळच्या मुख्यमंत्र्यांनी केले, असा हल्लाही संजय केळकर यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.