BJP vs Shivsena : भाजपने डाव साधला, एकनाथ शिंदेंची धाकधूक वाढली;'त्या' प्रवेशानंतर वर्चस्व राखण्याचे आव्हान

Sarpanch Jyoti Jadhav Join BJP : कल्याण ग्रामीणमध्ये भाजपमध्ये होत असलेले पक्षप्रवेश एकनाथ शिंदेंची डोकेदुखी वाढवणारे आहेत.
Eknath Shinde BJP
Eknath Shinde BJP Sarkarnama
Published on
Updated on

BJP Politics : एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व असलेल्या ठिकाणी भाजपने पद्धतशीरपणे सुरुंग लावण्यास सुरुवात केली आहे. खोणी ग्रुप ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंचासह ठाकरे गट आणि मनसेच्या शेकडो पदाधिकाऱ्यांनी भाजपामध्ये पक्षप्रवेश केल्याने कल्याण ग्रामीण मधील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

विद्यमान सरपंच ज्योती जाधव, माजी सरपंच ज्योती हनमंत जाधव, ठाकरे गटाचे किरण ठोंबरे, मनसेचे महेश ठोंबरे, संजय पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

आगामी निवडणुकीच्या तोंडावर भाजपाने गावातील मोठे मासे गळाला लावून आपली राजकीय ताकद वाढविण्याची चाल खेळली असल्याचे मानले जात आहे. या घडामोडींचा फटका केवळ ठाकरेंच्या शिवसेना , मनसेला नाही तर महायुतीतील सहयोगी पक्ष असलेल्या शिंदे शिवसेनेला देखील बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेत धाकधुक वाढली असून स्थानिक पातळीवर आपले वर्चस्व कायम राखण्याचे आव्हान त्यांच्यासमोर निर्माण झाले आहे.

अंबरनाथ तालुक्यातील श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून खोणी ग्रामपंचायतीची ओळख आहे. तसेच ही ग्रामपंचायत गेल्या दोन दशकांपासून शिवसेना आणि भाजप यांच्यातील वर्चस्वाच्या संघर्षाचे केंद्र राहिली आहे. २०१७ मध्ये भाजपचे हनुमान ठोंबरे यांनी शिवसेनेची तब्बल २० वर्षांची सत्ता उलथवून लावत राजकीय इतिहास घडविला होता.

येथे भाजपाची सत्ता आणण्यात केडीएमसीचे नगरसेवक महेश पाटील यांचा मोठा हात होता. ठाकरे गटाचे दोन सदस्य गायब करण्यात त्यांचा हात होता अशी चर्चा त्यावेळी राजकीय वर्तुळात होती. तसेच ठाकरे गटाच्या इतर दोन सदस्यांनी भाजपाला मतदान केल्याने येथे भाजपाचे कमळ फुलले होते.

Eknath Shinde BJP
Dombivli Politics : विधान परिषदेची धामधूम सुरू असतानाच शिंदेंनी डाव टाकला; भाजप नेत्यांसह शेकडो पदाधिकाऱ्यांचा शिवसेनेत प्रवेश

त्यानंतरच्या काळात २०२१ मध्ये महेश पाटील यांनी भाजपाची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. पाटील यांच्यासोबत हनुमान ठोंबरे यांसह अनेक स्थानिक नेते शिवसेनेत दाखल झाल्याने भाजपाची ताकद ग्रामीण भागात कमी झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. महेश पाटील यांच्या जाण्याने आमदार रविंद्र चव्हाण यांनी आम्ही कुठे कमी पडलो अशा शब्दात आपली खंत व्यक्त केली होती.

मात्र राजकीय वारे पुन्हा फिरले आणि केडीएमसी पालिका निवडणुकीच्या तोंडावर महेश पाटील यांनी शिंदे सेनेची साथ सोडून भाजपात घरवापसी केली. कल्याण ग्रामीणची जबाबदारी त्यांच्यावर पक्षाने सोपवल्यानंतर त्यांनी पक्षबांधणीला वेग दिला आहे. पाटील यांच्या पुनरागमनाने पुन्हा एकदा खोणीच्या राजकारणाचा पट बदलताना दिसत आहे.

त्यांच्या पुढाकारातून विद्यामान सरपंचासह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. विशेष म्हणजे, खोणीसह १४ गाव परिसरातील प्रभावी राजकीय आणि सामाजिक चेहरे भाजपच्या गोटात गेल्याने पक्षाला स्थानिक स्तरावर मोठे बळ मिळाल्याचे मानले जात आहे.

शिवसेनेच्या वर्चस्वाला धक्का

राजकीय जाणकारांच्या मते, भाजपने या पक्षप्रवेशातून एकाच वेळी दोन लक्ष्यांवर निशाणा साधला आहे. एकीकडे मनसे, ठाकरे गटाच्या संघटनात्मक बळाला धक्का देण्यात यश मिळविले, तर दुसरीकडे कल्याण ग्रामीण भागातील भविष्यातील नेतृत्वावरही दावा मजबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. महायुतीत भाजप आणि शिंदे सेना एकत्र असले तरी स्थानिक पातळीवर कार्यकर्ते, पदाधिकारी आणि मतदारांवरील प्रभाव यासाठी दोन्ही पक्षांमध्ये स्पर्धा असल्याचे वास्तव लपून राहिलेले नाही.

शिंदेच्या शिवसेनेला इशारा

या पक्षप्रवेशाकडे शिंदे गटासाठीही इशारा म्हणून पाहिले जात आहे. कारण भाजपची वाढती ताकद भविष्यात जागावाटप आणि स्थानिक राजकीय वर्चस्वाच्या चर्चेत निर्णायक ठरू शकते. मात्र दुसरीकडे हनुमान ठोंबरे यांच्यासारखे प्रभावी नेते अजूनही शिंदे सेनेसोबत असल्याने भाजपला संपूर्ण मैदान मोकळे मिळालेले नाही. आगामी महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खोणीतील ही राजकीय घडामोड केवळ पक्षप्रवेश नसून कल्याण ग्रामीणमधील सत्तासमीकरणांच्या नव्या अध्यायाची सुरुवात मानली जात आहे.

Eknath Shinde BJP
Konkan Politics : कोकणात राजकीय भूकंप! भाजपचा शिंदेंसह ठाकरेंना धक्का; तीन बड्या नेत्यांसह १०० पदाधिकाऱ्यांचा रामराम

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com