

Doctors assault case : कल्याण डोंबिवली महापालिकेतील शिवसेनेचा मारकुटा नगरसेवक रमेश म्हात्रे मुंबई हायकोर्टाने चांगलीच अद्दल घडविली आहे. डोंबिवली येथील महापालिका रुग्णालयातील महिला डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या म्हात्रेला कोर्टाने शुक्रवारी जामीन मंजूर केला. मात्र, जामीन मंजूर करताना कोर्टाने म्हात्रेच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हायकोर्टात शुक्रवारी म्हात्रेसह अटकेत असलेल्या अन्य आरोपींच्या जामीन अर्जावर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान कोर्टाने म्हात्रेच्या कृत्यावर जोरदार ताशेरे ओढले. लोकप्रतिनिधी हे जनता निवडून देते आणि ते जनतेच्या सेवेसाठी असतात, हा लोकशाहीचा सिध्दांत आहे. मात्र, लोकप्रतिनिधी जर मतदारांवरच हल्ला करत असतील तर ही बाब लोकशाही मूल्यांनाच तडा देणारी असल्याचे निरीक्षण कोर्टाने यावेळी नोंदविले.
म्हात्रे याच्यासह तिघांना जामीन मंजूर करताना कोर्टाने कडक अटीही घातल्या आहेत. सर्वात मोठी अट म्हणजे, किमान आरोपपत्र दाखल होईपर्यंत आरोपींनी महाराष्ट्राबाहेर राहावे, असे आदेश देण्यात आले आहेत. आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच ते महाराष्ट्रात पाऊल ठेऊ शकतात. एवढेच नाही तर महाराष्ट्राबाहेर ज्या ठिकाणी आरोपी राहतील, तेथील स्थानिक पोलीसांसमोर आठवड्यातून तीनवेळा त्यांना हजर राहावे लागेल, अशी अटही कोर्टाने घातली आहे.
प्रकरणातील साक्षीदारांशी संपर्क किंवा पुराव्यांची छेडछाड करू नये, असेही कोर्टाने बजावले आहे. स्थानिक न्यायालयात पासपोर्ट जमा करण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहेत. दरम्यान, कोर्टाने या प्रकरणाची सुनावणी जलदगतीने करण्याचे महत्वपूर्ण आदेशही कोर्टाने दिले आहेत. राज्य सरकारला विशेष सरकारी वकील नेमण्यास सांगत त्यांना केसचा निकाल लागेपर्यंत बदलण्यात येऊ नये, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.
मारहाण झालेल्या तीन डॉक्टरांना सुरक्षा पुरविण्यास सांगण्यात आले आहे. तसेच महापालिकेने त्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करू नये, असेही कोर्टाने आदेशात म्हटले आहे. दरम्यान, रमेश म्हात्रे या जामिनावर सुटल्यानंतर गोव्यात राहणार असल्याची माहिती त्याच्या वकिलांनी हायकोर्टात दिली आहे. आरोपपत्र दाखल होईपर्यंत तो गोव्यातच राहील, असे वकिलांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.