

येत्या लोकसभा निवडणुकीतील महाविजयासाठी भाजपने अभियान सुरू केले असून, त्याअंतर्गत त्यांनी विरोधी पक्षाचे खासदार असलेले मतदारसंघ आपल्या रडारवर घेतले आहेत. त्यातूनच काल त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गटाचे) खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या शिरूर मतदारसंघाचा दौरा केला. त्यावर भावना मुर्दाड झालेले बावनकुळे कितीही फिरले तरी या वेळी जनतेने ठरविलेले आहे, असा हल्लाबोल खा. कोल्हेंनी लगेच केला.
गेल्या अकरा दिवसांपासून कुटुंबासह साखळी उपोषणाला बसलेल्या तळेगाव दाभाडे (ता. मावळ, जि. पुणे) येथील कामगारांची कोल्हेंनी भेट घेतली. त्यावेळी त्यांनी 'बावनकुळेंना फक्त निवडणुका पाहायच्यात, त्यांना फक्त मते पाहिजेत, त्यांना हा कामगार दिसत नाही, हे देशाचे दुर्दैव आहे,' अशी खंत व्यक्त केली. 'माझ्या मतदारसंघात गेलेल्या बावनकुळेंना माझा सवाल आहे की, नेपाळमधून टोमॅटो आयात करून त्यांनी माझ्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या टोमॅटोचा चिखल का केला, फडणवीसांनी दोन लाख टन कांदा आयात करून त्यांचा कांदा का नासवला, याची उत्तरे त्यांनी द्यावीत, असा प्रश्नही त्यांनी विचारला.
केवळ निवडणुका, राजकारण, मतं याच्यापलीकडे जाऊन माणसंही राहतात या देशात. त्यांच्या अपेक्षांचा त्यांनी विचार करावा, असा सल्ला त्यांनी दिला. डिसेंबर २०२० मध्ये देवेंद्र फडणवीसांनी या कामगारांच्या बाजूने तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले होते. आता तेच फडणवीस हे उपमुख्यमंत्री असताना या कामगारांना ११ दिवस उपोषण करावे लागते आहे, याचे वाईट वाटते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
ज्या बारा मावळात छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणाचं स्वराज्य निर्माण केलं, त्याच मावळ प्रांतामध्ये रयतेला तिच्या हक्कासाठी, कामगारांना त्यांच्या हक्कांसाठी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत, त्यांच्या लहान लहान लेकरांसमवेत उपोषण करावं लागतंय, ही खरोखर अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे.
प्रशासन व कॉर्पोरेट्स यांच्या कुटील डावाला जर सरकारचं पाठबळ लाभलं, तर कामगारांच्या भविष्यात अंध:कार पसरेल! अशी भीती त्यांनी वर्तवली. सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन रयतेच्या कल्याणाच्या बाजूने भूमिका घ्यावी आणि लवकरात लवकर या कामगारांच्या रोजगारावर कोसळलेलं हे संकट दूर करण्यासाठी तातडीने पावले उचलावीत, अशी विनंती त्यांनी केली.
Edited by : Rashmi Mane