Mumbai : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा जाहीर निषेध व्यक्त केला. तसेच उद्धव ठाकरेंवर जोरदार टीका केली.
यावेळी बेलताना मुख्यमंत्री शिंदे म्हाणाले, ''सावरकरांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधींचा आम्ही निषेध करतो. सावरकरांचं योगदान मोठं आहे. ते संपूर्ण देशाचे दैवत आहेत. आम्ही राज्यभरात 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा' काढणार आहोत. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या त्यागामुळे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. सावरकर होते त्या अंदमानच्या तुरुंगात राहुल गांधींनी एक दिवस राहून यावं'', अशी टीका करत अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं.
पण बोलण्याच्या भरात मुख्यमंत्री शिंदे हे दोन महत्वाचे मुद्दे विसरले. हे लक्षात येताच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रॉम्पटिंग केलं. पहिल्यांदा शिंदे मुद्दा विसरले तेव्हा फडणवीसांनी आठवण करून दिली. त्यानंतर पुन्हा शिंदेंना उत्तर सुचवले. त्यामुळे त्यांचा हा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला.
नेमकं काय घडलं?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज मुंबईत एकत्रित पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि उद्धव ठाकरेंवरही जोरदार टीका केली.
या पत्रकार परिषदेत सुरुवातीला मुख्यमंत्री शिंदे यांनी भूमिका मांडली. मात्र, बोलण्याच्या भरात मुख्यमंत्री शिंदे महत्वाचा मुद्दा विसरले. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात येताच त्यांनी मुख्यमंत्र्यांना लगेच प्रॉम्पटिंग केलं.
फडणवीस म्हणाले,'यात्रा, यात्रा', त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आम्ही राज्यभर 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा' काढणार आहोत, असं सांगत गौरव यात्रेची माहिती दिली.
याच पत्रकार परिषदेत दुसरा प्रसंगही पाहायला मिळाला. मुख्यमंत्री शिंदे यांना पत्रकारांनी 'गौरव यात्रा म्हणजे नेमकं तुम्ही काय करणार आहात?, असा प्रश्न विचारला. लगेच फडणवीसांनी शिंदेंना 'सेना आणि भाजप मिळून गौरव यात्रा काढतील, असं उत्तर सुचवलं. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी पुन्हा 'स्वातंत्र्यवीर सावरकर गौरव यात्रा ही सेना आणि भाजप मिळून काढणार आहोत, असं सांगितलं.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना देवेंद्र फडणवीसांनी प्रॉम्पटिंग केल्याचा प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला. याआधीही एकदा देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना प्रॉम्पटिंग केलं होतं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.