Mumbai News, 17 May : उद्धव ठाकरे आणि अमित शाह यांच्यात 'मातोश्री'त 'अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत' झालेल्या फॉर्म्युल्याची चर्चा अद्यापही सुरू आहे. बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवेल, असं वचन दिल्याचं अमित शाह यांना सांगितल्याचं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं होतं. यानंतर पद आणि जबाबदाऱ्यांचं समसमान वाटप होईल, असं अमित शाह ( Amit Shah ) यांनी बोलल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य करत 'अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाब'च्या 'अंदर की बात' सांगितली आहे.
उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) एकतर भ्रमिष्ठ झालेत किंवा खोटं बोलत आहेत, असं म्हणत फडणवीसांनी ( Devendra Fadnavis ) समाचार घेतला आहे. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ते संवाद साधत होते.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
देवेंद्र फडणवीस म्हणाले, "2019 मध्ये युतीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद मागितलं. याबद्दल वरिष्ठ निर्णय घेतली, तो मला मान्य असेल, असं मी त्यांना सांगितलं. नंतर रात्री एक वाजता मी अमित शाह यांना फोन करून उद्धव ठाकरे यांनी अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रिपदाबाबत तुमच्याशी चर्चा केली, असं बोललो. पण, 'याबाबत कुठलंही बोलणं झालं नसून आपण मुख्यमंत्री देऊ शकत नाहीत. त्यांना उपमुख्यमंत्रिपद, मंत्रीपदे चांगली खाते देऊ. मात्र, मुख्यमंत्रिपद देता येत नाही,' असं अमित शाह यांनी मला सांगितलं."
"मी ही माहिती उद्धव ठाकरेंना दिली. त्यावर ठाकरेंनी बोलणी पुढं न्यायाची नसल्याचं सांगितलं. तीन दिवसानंतर एका मध्यस्थाच्यामार्फत पुन्हा चर्चेसाठी बसलो. तेव्हा 'पालघरसह विधानसभेला जास्ती जागा, अधिकची मंत्रिपदे आणि अमित शाह यांनी 'मातोश्री'त चर्चेसाठी यावं,' असं ठाकरे म्हणाले. यासाठी अमित शाह तयार झाले, पण ठाकरेंनी वेगळ्या मागण्या करू नये, असंही मत त्यांनी ( शाह ) व्यक्त केलं. मी पुन्हा उद्धव ठाकरेंना बोललो आणि एकट्यात चर्चा करण्यास सांगितलं. ते ( ठाकरे ) म्हणाले, 'तुम्हाला चालेल का?' मी म्हणालो हो. दोघांनी चर्चा केली. नंतर मला 'मातोश्री'तील खोलीत बोलावण्यात आलं. 'मी मुख्यमंत्रिपदाबाबत टोकाची भूमिका घेतली होती. आता 'यू टर्न' घेतोय. परंतु, माझ्या शिवसैनिकांना काय सांगणार? त्यामुळे आम्ही प्रसारमाध्यमांशी बोलणार नाही. फक्त तुम्ही बोलताना शिवसैनिकांना वाटलं पाहिजे की काहीतरी चांगलं देतोय,' असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. पण, समसमानचा अर्थ होता, मंत्रिमंडळात जास्ती जागा, चांगली खाते देण्याची चर्चा झाली. यातील एक शब्द खोटं बोलत नाही," अशी माहिती फडणवीसांनी दिली.
"नंतर हॉटेल 'ब्लू सी' येथे काय बोलायचं हे मी 'मातोश्री'त दाखवलं. 'ब्लू सी'च्या पत्रकार परिषदेत फक्त मी बोललो. अमित शाह आणि उद्धव ठाकरे तिथे बोलले नाहीत. माणसाला खरे बोलायला विचार करावा लागत नाही. खोट बोलायला रोज नवीन स्टोरी करावी लागते. दुर्दैवानं उद्धव ठाकरे एकतर भ्रमिष्ठ झाले किंवा 'सिरियल लायर'प्रमाणे खोटं बोलत आहे," अशी टीका फडणवीसांनी केली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.