

K.C. Venugopal Will meet Uddhav Thackeray : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकर यांच्यावर केलेल्या विधानामुळे राज्यातील महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता निर्माण झाली होती. दरम्यान, शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भरसभेतून राहुल गांधी यांना इशारा दिला होता. 'सावरकर आमचे दैवत आहेत. त्यांचा आपमान सहन करणार नाही', असे ठाकरे म्हणाले होते. त्यानंतर विरोधकांच्या बैठकीवरही ठाकरे गटाने बहिष्कार टाकला. दरम्यान, सावरकर मुद्द्यावरुन राहुल 'बॅकफूट'वर गेले. मात्र काँग्रेस आणि ठाकरे गटात अनेक मुद्द्यांवर एकमत नसल्याचे दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi) अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चा आहे. तसेच ईव्हीएम (EVM), जेपीसी, उद्योगपती गौतम अदानी आणि महाविकास आघाडीमध्ये वंचित बहुजन आघाडीला (Vanchit Bahujan Aghadi) सामावून घेण्याबाबतही एकमत झालेले नाही. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनीही या मुद्द्यांवर वेगळी भूमिका घेतली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. ११) उद्धव ठाकरे यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. त्यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली.
दरम्यान, लोकसभेत विरोधकांनी केलेल्या चर्चा, मागणीवरही शरद पवार (Sharad Pawar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यावर काँग्रेसनेही स्पष्टीकरण दिले. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, विरोधकांतील २० पैकी १९ पक्षांचे सर्व मुद्द्यांवर एकमत आहे. देशातील आणि राज्यातील विविध घटनांच्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसचे महासचिव के. सी. वेणूगोपाल (K. C. Venugopal) उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे. ते पुढील आठवड्यात ठाकरेंना भेटणार आहेत. यासाठी वेणूगोपल यांच्याकडून ठाकरेंची वेळ मागितली असल्याची माहिती खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे.
संजय राऊत म्हणाले, "काँग्रेसचे महासचिव के.सी. वेणूगोपल यांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची वेळ मागितली आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे (Mallikarjun Karage) यांच्यावतीने काही दिवसांत वेणूगोपाल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतील. त्यावेळी ते विविध विषयांवर चर्चा करतील."
या भेटीत महाविकास आघाडीती एकमत नसलेल्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच त्यावर काही तोडगा काढता येतो का, त्यावरही विचार केला जाईल. महाविकास आघाडीत जेपीसी, सावरकर, वंचित आघाडी, अदानी यासह काही मुद्द्यावर अद्याप तोडगा निघालेला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.