Mumbai News, 20 Mar : दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरण (Disha Salian death case) पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात एक याचिका दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी दिशाच्या मृत्यूची पुन्हा चौकशी करण्याची मागणी केली.
या याचिकेत त्यांनी आपल्या मुलीने आत्महत्या केली नाही तर, तिच्यावर सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोप केला आहे. तसंच या याचिकेत ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे या प्रकरणावरून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापलं आहे.
याच प्रकरणावरून महायुतीतील नेत्यांनी आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. आदित्य यांना तात्काळ अटक करण्याची मागणी महायुतीच्या (Mahayuti) आमदारांनी गुरुवारी सभागृहात केली. गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या प्रकरणात एसआयटी चौकशी सुरु आहे. मात्र त्याचा अहवाल अद्याप प्राप्त झाला नाही.
मात्र, आम्ही कोर्टाच्या निर्देशानुसार कारवाई करु असं सांगितलं. त्यानंतर भाजप आमदार नितेश राणेंनी (Nitesh Rane) सर्वोच्च न्यायालयाच्या एका आदेशानुसार अशा प्रकरणात ज्या संबंधित व्यक्तीवर आरोप होतो, त्याला तात्काळ अटक करुन त्याची चौकशी करावी लागते, असं म्हणत अप्रत्यक्षपणे आदित्य यांच्या अटकेची मागणी केली.
सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी होत असतानाच आता या प्रकरणावर करुणा शर्मा यांनी एक पोस्ट करत दिशा सालियनप्रमाणे पूजा चव्हाणलाही न्याय देण्याची मागणी केली आहे. ज्याप्रमाणे दिशा सालियनसाठी न्याय मागत आहात. त्याप्रमाणेच पूजा चव्हाणला पण न्याय द्या आणि सीबीआय चौकशी लावा, असं त्यांनी पोस्टमध्ये लिहिलं आहे.
पूजा चव्हाण हे प्रकरण शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार माजी मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याशी संबंधित आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना याप्रकरणावरुन राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. त्यामुळे सत्ताधारी दिशा सालियान प्रकरणावरून आदित्य ठाकरेंवर हल्लाबोल करत असतानाच करुणा शर्मा यांनी पूचा चव्हाण प्रकरणाचा उल्लेख केल्यामुळे आता या प्रकरणावर सत्ताधारी काय प्रतिक्रिया देणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, पूजा चव्हाण प्रकरणावरून ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवें यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले, "वाघ पूजा चव्हाण प्रकरणाची बाजू ताकदीनं मांडत होत्या. त्याचं काय झालं? दिशा सालियन प्रकरणी जी भूमिका आहे तिच पूजा चव्हाण बद्दल असायला हवी. महिलांचा आदर करतो मात्र राजकीय हेतूनं आरोप करणं चुकीचे आहे. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सभागृहाचा उपयोग झाला पाहिजे."
२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.