शर्मिला वाळुंज
डोंबिवली : शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी कॉल केला आणि त्याचीच चर्चा आता राजकीय वर्तुळात नव्याने रंगू लागली आहे. यावरुन मनसेचे (MNS) एकमेव आमदार राजू पाटील यांनी जवळीक होऊ शकते, परंतू सर्वस्वी निर्णय हा राज ठाकरे यांचाच असल्याचे सूचक विधान केले आहे. मनसे भाजपच्या युतीनंतर आता मनसे व शिंदे गट युती होते का ? याकडे सर्वांचे लक्ष लागले असून याचे पडसाद स्थानिक पातळीवर देखील उमटण्याची शक्यता असल्याने जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
राज्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असा सामना रंगला आहे. शिंदे हे आपला गट एखाद्या राजकीय पक्षात विलीन करतील अशी चर्चा आहे. त्यातच मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला. यावेळी त्यांच्यात राजकीय चर्चा देखील झाल्याचे बोलले जात आहे. याविषयी मनसेचे एकमेव आमदार व विधानसभा निवडणूकीत महत्त्वाची भूमिका बजावणारे राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
राजू पाटील सध्या बाहेर आहेत. मात्र त्यांनी याविषयी बोलताना सांगितले, गेल्या दोन दिवसांपासून मी राज साहेबांच्या संपर्कात नाही. प्रसार माध्यमांच्या मार्फतच मला हे समजले आहे की राज साहेब यांना एकनाथ शिंदे यांनी तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फोन केला होता. त्यांचे पहिल्यापासून एकमेकांशी चांगले संबंध आहेत. मध्ये काही नेतृत्वाच्या अडचणी असतील त्यामुळे त्यांचा संपर्क तुटला होता. यावेळी त्यांनी एक कॉल केला असेल. सध्या जे राजकारण सुरु आहे, ते पाहता शिवसेना आणि महाविकास आघाडीचा हा अंतर्गत वाद आहे. त्यामुळे या घडीला आम्हाला त्याच्यात काही रस नाही.
शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला याला अनेक कारणे आहेत. परंतू त्यातील एक कारण म्हणजे त्यांनी सांगितलेला हिंदूत्वाचा मुद्दा. जो मुद्दा आम्ही राज साहेबांच्या माध्यमातून त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे घेऊन जात आहोत. हे काही कॉमन मुद्दे आहेत, त्या अनुषंगाने जवळीक होऊ सुद्धा शकते. परंतु सर्वस्वी निर्णय हा राज साहेबांचा असून त्यावर मी काही भाष्य करु इच्छित नाही, असे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.