
Mumbai News : विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आता तब्बल 20 दिवस उलटले आहे,तरीदेखील महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त ठरलेला नाही. त्यामुळे विरोधकांकडून महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. यातच आता सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तार आणि शपथविधीची जोरदार तयारी सुरु करण्यात आली.
शिक्कामोर्तब झालेले नसले तरी पुढील 48 तासांतच महायुती सरकारच्या उर्वरित मंत्र्यांचा शपथविधी होण्याची दाट शक्यता आहे.याच पार्श्वभूमीवर आता मुंबईत मोठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एकनाथ शिंदे यांची सलग दुसर्या दिवशीही भेट घेतल्यानं उलटसुलट चर्चांना उधाण आलं होतं. मात्र, त्यांच्या या दोन भेटीनंतर शिंदे यांनी आपलं एक पाऊल मागं घेतलं असून ते आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीसाठी शुक्रवारी (ता.13) रात्री उशिरा सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत.मंत्रिमंडळ विस्तार,शपथविधी सोहळा या सगळ्या धर्तीवर शिंदे -फडणवीस भेट अतिशय महत्त्वाची मानली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे महायुतीत नाराज असल्याची चर्चा आहे.त्यांनी स्वत:जरी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केलं असलं तरी महायुतीतील काही लक्षवेधी घडामोडींमुळे त्यांच्या नाराजीच्या चर्चांना हवाच मिळाली आहे. शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडताना भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडे गृहमंत्रिपदाचा आग्रह धरला होता. मात्र, भाजपने तो आग्रह अव्हेरला, त्यामुळे शिंदे यांच्यापुढे पेच निर्माण झाला होता.
पण गेले दोन दिवस दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतच्या भेटी, बैठकांनंतर आता होत असलेल्या फडणवीस आणि शिंदे यांच्या सागर बंगल्यावरील भेटीमुळे लवकरच रखडलेल्या खातेवाटपाचा पेच सुटण्याची शक्यता आहे. शिंदे यांची नाराजी दूर करण्यासाठी खुद्द फडणवीस हे मैदानात उतरल्याचे दिसून येत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गेल्या चोवीस तासांत एकनाथ शिंदे यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. तत्पूर्वी बावनकुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती. मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठींना मोठे महत्व आहे. फडणवीस-पवार यांच्या भेटीनंतर बावनकुळे यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन शिंदे यांची भेट घेतली आहे.
चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये तब्बल ४० मिनिटे बैठक झाली. त्यातून एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न झाली आहे की संभाव्य मंत्रिमंडळाच्या यादीवर चर्चा करण्यात आली, याची उत्सुकता वाढली आहे. आता प्रत्यक्षात रविवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीला कोणती खाती मिळतात, हे समजणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.