

Eknath Shinde: राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळं कुणाल कामरा आणि सुषमा अंधारे यांना विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीनं नोटीस पाठवली आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांनी ही विशेषाधिकार भंगाची नोटीस पाठवली आहे. उद्या, ५ फेब्रुवारी २०२६ रोजी या दोघांना दुपारी २ वाजता समितीसमोर हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
कुणाल कामरा हा स्टँडअप कॉमेडियन असून त्यानं मुंबईतील एका स्टुडिओमध्ये कार्यक्रमादरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर विडंबनात्मक गाण सादर केलं होतं. यामध्ये त्यानं थेट एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता ठाण्याचा रिक्षा चालक आणि गद्दर या शब्दांचा वापर केला होता. शिवसेनेच्या फुटीवरुन त्यानं हे गीत सादर केलं होतं. या कार्यक्रमाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी ज्या स्टुडिओमध्ये हा कार्यक्रम पार पडला होता त्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तसंच कुणाल कामरा याला फोन करुन कारवाईचा इशाराही दिला होता.
दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी कुणाल कामरा याच्या या विडंबन गाण्याचं समर्थन केलं होतं. यामुळं मोठा राजकीय धुरळाही उडाला होता. कुणाल कामरा हा याप्रकरणातील प्रमुख व्यक्ती असला तरी त्याचं समर्थन केल्यामुळं आता सुषमा अंधारे यांना देखील विधानपरिषदेच्या विशेषाधिकार समितीनं पंधरा दिवसांपूर्वीच नोटीस पाठवली होती. पण आता त्यांना उद्याच समितीसमोर हजर राहून आपल्या वादग्रस्त विधानाबाबत म्हणणं मांडण्यासाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा आमदारांच्या विशेषाधिकाराचा भंग असल्यानं जर या समन्स प्रमाणे जर ते हजर राहू शकले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई देखील होऊ शकते.
या नोटीसीला सुषमा अंधारे यांनी समितीला लेखी उत्तर पाठवलं असून आपण उद्या समितीसमोर हजर राहू शकणार नाही, असं त्यांनी या पत्रात म्हटलं आहे. यासंदर्भात माहिती देताना अंधारे म्हणतात, "मी 5 फेब्रुवारीला हजर राहू शकत नाही हे आजच त्यांना सांगितलेलं आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकांच्या प्रचारामध्ये मी व्यस्त आहे त्यामुळे मला उद्या हजर राहणे शक्य नाही. या संदर्भात मी माझे म्हणणे लेखी कळवलेले आहे. बाकी लढत राहूया... गावागावात मशाल पेटली पाहिजे..."
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.