
Eknath Shinde’s Speech at Shiv Sena Anniversary - शिवसेनेचा ५९वा वर्धापन दिन आज साजरा होत आहे. या निमित्त अपेक्षेनुसार उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पक्षाचे स्वतंत्र मेळावे घेतले. याचबरोबर या दोन्ही मेळाव्यांमध्ये अपेक्षेप्रमाणेच एकमेकांवर जोरदार टीका, टिप्पणी केली गेली. उद्धव ठाकरेंच्या निशाण्यावर भाजप, पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अर्थातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे होते. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून या सर्वांवर सडकून टीका केली.
तर उद्धव ठाकरेंच्या भाषणानंतर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनीही मेळाव्यात जोरदार भाषण केलं. त्यांनी आपल्या भाषणातून पंतप्रधान मोदींचं कौतुक करत, उद्धव ठाकरेंच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं. शिवाय, काँग्रेस, राहुल गांधींसह विरोधी पक्षांवर टीकास्त्र सोडले.
उद्धव ठाकरेंनी त्यांच्या भाषणात त्यांच्या विरोधकांना आव्हान देण्यासाठी ‘कम ऑन किल मी..’ असा एक डायलॉग म्हटला. शिवाय, मला मारण्यासाठी येणार असाल तर अॅम्ब्युलन्स घेवून या. कारण, तुम्ही सरळ याल आणि आडवे जाल, असा इशारा दिला. यावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही तशाच स्टाईलने प्रत्युत्तर दिलं.
एकनाथ शिंदे म्हणाले, ‘’मरे हुए को क्या मारना है... महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत जनतेने तुमचा मुडदा आधीच पाडला आहे. नुसताच करून शोर मनगटात येत नाही जोर, हे लक्षात ठेवा. वाघाचं कातडं पांघरून लांडगा वाघ होत नाही. त्यासाठी वाघाचं काळीज लागतं आणि मनगटात जोर लागतो. नुसत्या तोंडाच्या वाफा सोडून चालत नाही. तो या माझ्या शिवसैनिकांमध्ये आहे. आमच्या नादाला तुम्ही लागू नका. आम्ही दोन-अडीच वर्षांपूर्वीच तुमचा टांगा पलटी करून टाकला आहे. हम किसको छेडते नही अगर हमे कोई छेडे तो छोडते नही.’’
तत्पुर्वी एकनाथ शिंदे म्हणाले, ‘’आज दुसराही कुठंतरी एक मेळावा सुरू आहे, पण आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा आहे आणि दुसरा सत्तेसाठी झालेल्या लाचारांचा मेळावा आहे, हा फरक आहे. अस्सल शिवसेना, हिंदुत्वाचा भगवा, शिवसेनेचा धनुष्यबाण आणि जनतेचा आशीर्वाद आपल्याकडे आहे. उबाठाने ज्या जागा जिंकल्या त्या काँग्रेसच्या मेहरबानीवर जिंकल्या आहेत. कारण, शिवसेनेच्या हक्काच्या मतदारांनी केव्हाच उबाठाला टाटा-बायबाय केलं आहे. आपल्याकडे आत्मविश्वास त्यांच्याकडे अहंकार आहे.’’
तसेच ‘’काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम कुणी केलं आणि सत्तेसाठी लाचारी पत्कारण्याचं काम कुणी केलं? हे देखील आपल्याला माहीत आहे. २०१९मध्ये शिवसेनेच्या मतदारांचा आणि बाळासाहेबांच्या विचारांचा, मराठी माणसाचां, हिंदुत्वाचा विश्वासघात त्यांनी केला. असा विश्वासघातकी माणूस या महाराष्ट्राने कधीही पाहिला नाही. इतक्या वेगाने तर सरडाही रंग बदलत नाही.’’ अशी टीकाही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं
याशिवाय ‘’मुख्यमंत्रिपदासाठी झाले लाचार, ते काय होणार बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार? तर सत्तेच्या खुर्चीसाठी आम्ही कधीही तडजोड करणार नाही, हे वचन आम्ही दिलेलं आहे. काहींना निवडणुकी आल्यावर जनतेची कार्यकर्त्यांची आठवण येते. नाहीतर हम दो अन् हमारे दो एवढंच असतं. आता निवडणुकीचं वारं फिरायला लागल्यावर त्यांना हिंदुत्वाची आठवण होत आहे. मराठी माणूस आठवत आहे. बाळासाहेबानंतर तुम्ही मराठी माणसासाठी काय केलं याचा हिशोब द्या.’’ अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी टीकास्त्र सोडलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.