Worli News : विद्यमान आमदार आदित्य ठाकरे हे पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांनी मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून पुन्हा एकदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. पण यंदाची लढत त्यांच्यासाठी नक्कीच सोपी नसणार आहे. ठाकरे यांच्याविरोधात मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी देत तगडं आव्हान उभं केलं आहे.
अशातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेकडूनही तगडा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी पूर्ण केली आहे. त्यामुळे वरळीत हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
शिवसेनेतील बंडखोरीनंतर आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिले होते.त्यावेळी त्यांनी मी घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना एक-दीड वर्षांपासून सांगतोय की, त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा आणि आमदारकीचा राजीनामा द्यावा. माझ्यासमोर वरळीतून लढावे, अन्यथा मी त्यांच्याविरुद्ध ठाण्यातून लढायला तयार आहे असं ललकारलं होतं.
त्यावेळी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी आदित्य यांच्या आव्हानाला प्रत्युत्तर दिले होते.पण मुख्यमंत्री शिंदेंनी कोणताही पलटवार केला नव्हता. पण आता शिंदेंसह महायुतीने आदित्य ठाकरेंचा त्यांच्या वरळी मतदारसंघात करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी मोठी व्यूहरचना तयार केली आहे.
विधानसभा निवडणुकीमध्ये मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघात यावेळी अटीतटीची लढत रंगण्याची शक्यता आहे. येथील विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्यासमोर मनसेने संदीप देशपांडे यांना उमेदवारी देत तगडं आव्हान उभं केलं आहे.
त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटानेही येथून बलाढ्य उमेदवाराला निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळे वरळीमधील चुरच वाढण्याची शक्यता आहे.
महायुतीकडून वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे यांची कोंडी करण्यासाठी जोरदार पावले उचलली जात आहे. त्याचाच भाग म्हणून वरळीमधून राज्यसभेवर पाठवण्यात आलेल्या खासदार मिलिंद देवरा यांना विधानसभा मतदारसंघाची शिवसेनेकडून उमेदवारी दिली जाण्याची दाट शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
मनसेने वरळीतून संदीप देशपांडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर महायुती त्यांनाच पाठिंबा दिला जाहीर करेल अशी चर्चा होती. पण आता शिंदेंनी इथे देवरांच्या रुपाने तगडं आव्हान आदित्य ठाकरेंच्या समोर उभं करणार असल्याचे बोलले जात आहे.
विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुरेश माने यांचा 67 हजार 427 मतांनी पराभव केला होता. मात्र,लोकसभा निवडणुकीत वरळीत महाविकास आघाडीच्या उमेदवाराला अवघं 6 हजार 403 मताधिक्य मिळालं होतं.
ही बाब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची धडधड वाढवणारी आहे. त्यातच आता या मतदारसंघात तिरंगी लढत होणार असल्यामुळे आदित्य ठाकरेंसाठी विजय सोपा नसणार आहे.
ठाण्यात अतिशय गलिच्छ राजकारण केलं जात असून ज्या महिलेला मारहाण करण्यात आली, त्याच महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला, मुख्यमंत्र्यांनी एका दिवसात सुसंस्कृत ठाण्याला बदनाम केलं अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मी ठाण्यातून निवडणूक लढणार आणि जिंकून दाखवणार असं जाहीर आव्हान आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिलं.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.