मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुखांच्या विरोधात सुरू असलेल्या 100 कोटी वसुली प्रकरणाच्या सीबीआय तपासात पहिली अटक आज (ता. ३१ ऑक्टोबर) झाली आहे. संतोष जगताप या मध्यस्थाला ठाण्यातून अटक करण्यात आली आहे. जगताप याला 4 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. (First arrest by CBI in Rs 100 crore recovery case)
मुंबईचे तत्कालीन पोलिस आयुक्त परमवीर सिंग यांनी राज्याचे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपयांच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यानंतर देशमुख यांना गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. देशमुख यांच्या नागपूर, मुंबई येथील घरांसह विविध कंपन्यांवर केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि सक्तवसुली संचानलयाकडून छापेमारी करण्यात आली आहे. देशमुख यांच्यासह त्यांच्या मुलांच्या घरांवरही छापे टाकण्यात आले होते. त्यामुळे हे प्रकरण राज्यात चांगलेच चर्चेत आहे.
दरम्यान, माजी गृहमंत्री देशमुख यांच्या कथित 100 कोटी वसुली प्रकरणात सीबीआयकडून आज पहिली अटक झाली आहे. ठाण्यातून संतोष जगताप या मध्यस्थाला अटक करण्यात आली आहे. याआधी सीबीआय रिपोर्ट्स लीक केल्याच्या प्रकरणात सीबीआयने अनिल देशमुख यांचे वकील आनंद डागा आणि एका सीबीआय अधिकाऱ्यालाही अटक केलेली आहे. पण, शंभर कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात सीबीआयकडून ही पहिली अटक करण्यात आलेली आहे. संतोष जगताप याला 4 दिवसांची सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे.
गृहमंत्री देशमुख यांच्यावर आरोप करून मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमवीर सिंग हे गायब झाले आहेत. त्यांच्यावर ठाणे आणि इतर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. ठाणे पोलिसांनी त्यांच्याविरोधात लूक आऊटची नोटीस बजावली आहे. मात्र ते कोठेही आढळून येत नाहीत. शंभर कोटींच्या प्रकरणी नेमण्यात आलेल्या चांदीवाल समितीसमोरही परमीवर सिंग हे हजर झाले नाहीत. त्यांनी वकिलास‘पॉवर ऑफ ॲटर्नी’ देत त्यांच्या माध्यमातून समितीसमोर हजेरी लावली होती.
आरोप झाल्यानंतर देशमुख हेही गायब झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीबीआय देशमुख यांच्या मागावर आहे, तसेच ईडीकडून त्यांना चौकशीसाठी वारंवार बोलविण्यात आले आहे. पण, देशमुख त्याही चौकशी हजर झालेले नाहीत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.