मुंबई : आयएनएस विक्रांत कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने भाजप (BJP) नेते माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांना आज अटकपूर्व जामीन मिळाला. चार दिवसांपासून नॉट रिचेबल असलेले किरीट सोमय्या जामीन मिळताच मुंबईत दाखल झाले. विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत न्यायालयाचे आभार मानले. कुठलाही गुन्हा केलेला नसताना खोटे आरोप करुन तुम्ही माझे तोंड बंद करु शकत नाही, अशा इशारा राज्य सरकारला दिला. मी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) सरकारमधील डर्टी मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणारच, असे आव्हानही त्यांनी दिले.
शिवसेनेचे (shivsena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आयएनएस विक्रांत बचावासाठी जमा केलेल्या पैशात सोमय्या यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर सोमय्या यांच्याविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता. त्या विरोधात सोमय्या यांनी अटकपूर्व जामीनसाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. मात्र, सत्र न्यायालयाने सोमय्यांना जामीन अर्ज फेटाळून लावला होता. तेव्हापासून सोमय्या नॉट रिचेबल होते. सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामिन अर्ज फेटाळल्यानंतर त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. अखेर मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला.
उच्च न्यायालयाकडून सोमय्या यांना अटकपूर्व जामीन मंजूर होताच संध्याकाळी ते मुंबई विमानतळावर अवतरले. ते म्हणाले, मी चार दिवस कुठे गेलो, हे सांगणार नाही. फक्त होमवर्क करण्यासाठी मी भूमिगत झालो होतो, एवढेच सांगेन. मी आयएनएस विक्रांत प्रकरणात दमडीचाही भ्रष्टाचार केला नाही. राऊत जरी आरोप करत असले तरी या सगळ्या प्रकरणी उद्धव ठाकरे मास्टरमाईंड असल्याचा आरोप त्यांनी केला.
राऊतांकडे कोणताही पुरावा नाही, त्यांनी केवळ स्टंटबाजी केली आहे. माझा न्यायालयावर पूर्ण विश्वास आहे. न्यायालयाने आज माझा जामीन मंजूर केला. याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमुर्तींचे मी आभार मानतो. मात्र, माझ्यावर गुन्हे दाखल करुन माझे तोंड बंद करणार असाल तर मी ठाकरे सरकारला इशारा देतो, आणखी जोमाने मी सरकारमधील डर्टी मंत्र्यांचे घोटाळे बाहेर काढणार", असे सोमय्या यांनी सांगितले.
दोन दिवसांनी परिवह मंत्री अनिल परब (Anil Parab) यांची केस दापोली कोर्टात याणार आहे. त्याच बरोबर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्याही केसेस न्यायालयात येणार आहे, असेही सोमय्या यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.